मुंबई: धुळे शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील वॉईन शॉप स्थलांतरीत करावे किंवा बंद करावे, अशी लोकभावना आहे. पुतळ्याचे पावित्र्य राखणे, शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित ठेवणे व लोकभावना शासनासाठी अत्यंत महत्वाची आहे. कायद्यातील तरतुदीनुसार हे वॉइन शॉप स्थलांतरित करण्याची तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरूवारी दिले. लोकभावना लक्षात घेता हे दुकान पुढील १० दिवस बंद करण्याचे आदेशही देसाई यांनी दिले.
धुळे शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र हे दुकान याच ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेत संतापाची भावना होती.
हे वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला धुळे शहरचे आमदार शाह फारूख अन्वर, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र ड्रुडी, उपायुक्त सुभाष बोडके, उपसचिव रविंद्र औटी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, वॉईन शॉप बंद करण्याबाबत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे सहभागी झाले होते.
या दुकान मालकाने स्वत: दुकानाचे स्थलांतर केल्यास सक्तीच्या स्थलांतरणाचा लाभ देण्यात यावा. धुळे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी समन्वयाने दुकान मालकाकडून दुकानाचे नियमानुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी. दुकान मालक स्थलांतरास मान्य असल्यास सक्तीचे स्थलांतरणचा लाभ देण्यात यावा. धुळे शहरातील जनतेच्या भावना महत्वाच्या असून या दुकानाबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करा, असे देसाई म्हणाले.
बैठकीनंतर उत्पादन शुल्क देसाई यांनी उपोषण करणाऱ्या आंदोलकांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा करीत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही केले. बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी माहिती दिली.