
मुंबईः अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) १८ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर सायामिक प्रवेश प्रक्रियेचे म्हणजेच कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
सीईटी सेलने अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया संपल्यानंतर पुढील टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात तात्पुरती गुणवत्ता यादी, या गुणवत्ता यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणे आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे या टप्प्यांचा समावेश आहे. हा टप्पा अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेशासाठी महत्वाचा मानला जातो.
या तारखा लक्षा ठेवा
- १८ जुलै २०२५: अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार.
- १९ जुलै ते २१ जुलैः तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत
- २४ जुलैः अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार.
तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत २१ जुलै रोजी संपल्यानंतर २४ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर कॉमन ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे सीईटी कक्षाने म्हटले आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी २८ जून ते १४ जुलैदरम्यान ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्यात आले. एकूण २ लाख १३ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर एमबीए प्रवेशासाठी ४९ हजार ९३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
