
नाशिकः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित स्तानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? याची उत्सुकता सगळ्याच लागलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यात सुरू करा, असे निर्देश दिलेले आहेत. आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारीदरम्यान होतील, असे वाघमारे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येकच पक्षाला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रत्येक पक्षाकडून स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात पक्षप्रवेशही करवून घेतले जात आहे. एकीकडे राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरु असतानाच राज्य निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे.
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज नाशिक येथे निवडणूक पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत माहिती दिली. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत. या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे नाही. म्हणजेच या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतील. कोणती निवडणूक आधी घेतली जाईल आणि कोणती निवडणूक नंतर घेतली जाईल, हे अद्याप निश्चित नाही, असे वाघमारे म्हणाले.
राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने तर होतीलच शिवाय या निवडणुका दिवाळीनंतरच घेतल्या जातील, असे संकेतही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील, असेही वाघमारे म्हणाले.
व्हीव्हीपॅटचा वापर नाही
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमद्वारेच घेतल्या जाणार असल्या तरी या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारित ज्या निवडणुका होतात, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही. कारण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात आणि त्यांची मोजणी करायची असते, असे वाघमारे म्हणाले.
विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघात एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो. त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर केला जातो. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करणे अधिक वेळखाऊ ठरणारे असल्यामुळे या निवडणुकांत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही, असे वाघमारे म्हणाले.
