हसन मुश्रीफांच्या घरी भल्या पहाटे ईडीचा पुन्हा छापा!


कोल्हापूरः  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज भल्या पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या पथकाने पुन्हा एकदा छापा टाकला. आज, शनिवारी पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवास्थानी धडकले. मुश्रीफ यांच्यावरील ईडीची दीडमहिन्यातील ही दुसरी कारवाई आहे.

कोल्हापुरातील सारखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतवून हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी हा साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

किरिट सोमय्या यांच्या या आरोपानंतर ईडीने ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे मारले होते. या कारवाईत ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती.

एखाद्या राजकीय नेत्याच्या घरावर भल्या पहाटे अशा पद्धतीने कारवाई करण्याच्या ईडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. ईडीने अशा प्रकारे पहाटे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा टाकला, ही धक्कादायक बाब आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आणखी कितीवेळा छापे टाकणार? असा सवाल केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याच प्रकरणात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने मत व्यक्त केले की, एजन्सीजचा गैरवापर केला जातो आहे. लोकांच्याही लक्षात या गोष्टी आल्या आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे अशा प्रकारे धाडसत्र राबवले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचे हाच यामागे अजेंडा दिसून येतो. याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे पाटील म्हणाले.

किरिट सोमय्यांची होणार न्यायालयीन चौकशीः हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असून भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने किरिट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश या सुनावणीदरम्यान दिले आहेत. या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने ही कारवाई केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!