
नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील घोळामुळे महाविकास आघाडीच्या टिकेचे लक्ष्य बनलेल्या निवडणूक आयोगाने आता मतदानाची अचूक टक्केवारी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून बिहार विधानसभा निवडणुकीसापासून ही नवीन पद्धत अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे जनतेला दर दोन तासांनी अचूक टक्केवारी उपलब्ध होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने व्होटर टर्नआऊट रेशो (व्हीटीआर) म्हणजेच मतदान टक्केवारी अद्ययावत करण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज प्रणाली सादर केली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे पारंपरिक अहवाल देण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होणारा वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
१९६१ च्या निवडणूक आचारसंहितेच्या नियम ४९एस अंतर्गत, प्रत्येक मतदान केंद्रातील प्रिसाइडिंग ऑफिसर (पीआरओ) यांना मतदान समाप्तीनंतर उमेदवारांचे प्रतिनिधी असलेल्या पोलिंग एजंट्सना फॉर्म १७ सी देणे बंधनकारक आहे. ही कायदेशीर अट यथास्थित राहणार आहे. मात्र, VTR App च्या माध्यमातून जनतेला अंदाजे मतदान टक्केवारीची माहिती देण्याची जी पूरक, ऐच्छिक प्रक्रिया सुरू होती, ती आता अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यात येत आहे.
ECINET App द्वारे थेट नोंदणी
नवीन प्रणालीअंतर्गत, मतदानाच्या दिवशी प्रत्येक दोन तासांनी पीआरओ मतदानाची टक्केवारी थेट ECINET App वर नोंदवणार आहेत. ही माहिती स्वयंचलितरीत्या मतदारसंघ पातळीवर एकत्र केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणेच, अंदाजे मतदान टक्केवारी दर दोन तासांनी प्रसिद्ध केली जाईल.
विशेष म्हणजे, मतदान समाप्तीनंतर पीआरओ मतदान केंद्र सोडण्यापूर्वी ECINET वर अंतिम मतदानाची माहिती भरतील. यामुळे माहिती अपलोड होण्यात होणारा विलंब कमी होईल आणि निवडणूक आयोगाच्या VTR App वर वेळेत आणि अचूक माहिती उपलब्ध होईल. जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे ही माहिती ऑफलाइन स्वरूपात साठवून, नेटवर्क पुन्हा उपलब्ध झाल्यावर ती अपलोड करता येईल.
विलंब, त्रुटी होणार दूर
पूर्वी मतदानाची आकडेवारी सेक्टर ऑफिसर्सद्वारे गोळा केली जाई आणि फोन, एसएमएस किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे परत पाठवली जात होती. परिणामी, मतदान टक्केवारीच्या अद्ययावत माहितीत ४-५ तासांपर्यंत विलंब होत असे आणि त्यामुळे चुकीची समजूत पसरत असे.
नवीन प्रणालीमुळे या सर्व त्रुटींवर मात करत आगामी बिहार निवडणुकीआधी ECINET आणि त्यातील अद्ययावत VTR App ही एक महत्त्वाची यंत्रणा म्हणून काम करणार आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रात झाला टक्केवारीचा घोळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. मतदानाच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री उशिरा ११. ३० वाजता आकडेवारी जाहीर केली तेव्हा ६५.०२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले तर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी ६६.०५ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत जवळपास साडेसात टक्क्यांनी मतदान वाढले. ते कसे वाढले? याचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसने निवडणूक आयोगावर टिकास्त्र सोडले होते.
