डॉ. मझहर खानने खुलताबाद पोलिस ठाण्याच्या कोठडीतून फोन करून खंडणी मागितलेल्या चार मोबाईल नंबरपैकी एक नंबर एपीआय दिनकर गोरेंचा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत स्वत:चे सर्वच्या सर्व पेपर बेकायदेशीरपणे दुसऱ्यांकडून लिहून घेतल्याप्रकरणी खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असलेला कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खानने पोलिस कोठडीतूनच कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्याना फोनवरून धमकावत खंडणीची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली असतानाच पोलिस कोठडीतून फोन करण्यासाठी डॉ. मझहर खानने जे चार मोबाईल नंबर वापरले त्यापैकी एक मोबाईल नंबर खुलताबाद पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांचा असल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १६ ते २१ जानेवारी या काळात एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा झाली. या परीक्षेत डॉ. मझहर खान आणि त्याची पत्नी आस्मा खान यांनी आपले सर्वच्या सर्व पेपर बाळू भोपळे आणि फिरोज शेख या कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे लिहून घेतल्याप्रकरणी ६ जून रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात मझहर आणि आस्मा खानसह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्यात खुलताबाद पोलिसांनी डॉ. मझहर खानला मंगळवारी (१७ जून) अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून डॉ. मझहर खान सध्या खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत आहे.

खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असताना डॉ. मझहर खानने कोहिनूर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शेख कमरूनिसा बेगम इक्रमोद्दीन यांना १८ व १९ जून रोजी चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कॉल केले आणि त्यांना धमकावत खंडणीची मागणी केली. डॉ. मझहर खानने पोलिस कोठडीतून धमक्या देत खंडणीच्या मागणीसाठी वापरलेले मोबाईल क्रमांक ८८८८८३७५९४, ९६५७२२९४९४, ७८८७४२४२८३, ९८८११०००० असे आहेत. यापैकी ८८८८८३७५९४, ९६५७२२९४९४  या मोबाईल नंबरवरून १८ जून रोजी तर , ७८८७४२४२८३, ९८८११०००० या मोबाईल नंबरवरून १९ जून रोजी कॉल करण्यात आले.

१८ जून रोजी ८८८८८३७५९४ या मोबाईल क्रमांकावरून मझहर खानने कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख कमरूनिसा बेगम इक्रमोद्दीन यांना फोन करून धमकावले आणि खंडणी मागितली तो मोबाईल नंबर खुलताबाद पोलिस ठाण्यातच कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांचा आहे. धमकी आणि खंडणीच्या या प्रकरणात खुलताबाद पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याचाच नंबर वापरण्यात आल्यामुळे खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत डॉ. मझहर खानला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येत असल्याची आणि त्याला हवे करू दिले जात असल्याची शंका घ्यायला बराच वाव आहे. आता ग्रामीणचे पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!