डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘वैदिक ब्रह्मविद्ये’चे खुलेआम उदात्तीकरण, दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी दिला उपराष्ट्रपतींना ‘उपनिषद’ ग्रंथ भेट!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सबंध जगापुढे धर्मनिरपेक्षतेचा अनोखा घालून देणाऱ्या भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातच वैदिक ब्रह्मविद्येचे खुलेआम उदात्तीकरण केले जात आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना ‘उपनिषद’ हा धार्मिक ग्रंथ हेतुतः भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भगवीकरण होत असल्याचेच दाखवून दिल्याची टिका होऊ लागली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या दीक्षांत समारंभासाठी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना निमंत्रित करण्यात आले होते. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दीक्षांत समारंभाच्या मंचावर उपराष्ट्रपतींच्या पत्नी सुदेश धनखड, भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे प्र कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या सर्व विद्या शाखांचे अधिष्ठात्यांना प्रेक्षकांमध्ये बसवण्यात आले होते. या दीक्षांत समारंभात प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. प्रोटोकॉल भंगावरून निर्माण झालेला वाद सुरूच असताना आता कुलगुरू डॉ. फुलारी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना उपनिषद हा ग्रंथ भेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. या सार्वजनिक कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना वैदिक ब्रम्हविद्या म्हणून ओळखला जाणारा ‘उपनिषद’ हा धार्मिक ग्रंथ जाहीररित्या भेट देऊन सत्कार केला. ‘उपनिषद’ हा काही भारताचा राष्ट्रीय ग्रंथ नाही. तो धार्मिक ग्रंथ असून त्याला वैदिक ब्रह्मविद्या संबोधले जाते. उपनिषदांमध्ये परमेश्वर, ब्रह्म आणि आत्म्याचे स्वभावाचे वर्णन आहे. जीव आणि विश्वाची निर्मिती ब्रह्मापासून झाल्याची अंधश्रद्धा या उपनिषदांतून परवण्यात आली आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणाऱ्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठातच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना ‘उपनिषद’हा धार्मिक ग्रंथ भेट दिल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुलगुरूंच्या या कृतीवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी उपराष्ट्रपतींना संविधानाची प्रत भेट दिली असती तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते. पण कुलगुरूंनी हेतुतः उपनिषद भेट दिल्यामुळे त्यांना विद्यापीठात मनुवादाचे बीजारोपण करायचे आहे की काय? असा सवालही अनेकांनी केला आहे.

कोण काय म्हणाले?

  • हे विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विभूषित झालेले विद्यापीठ आहे. या विदयापीठाला पुरोगामी विचारांची दीर्घ परंपरा आहे. अशा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी उपराष्ट्रपतींना उपनिषद भेट देणे सर्वार्थाने निषेधार्ह आहे. विद्यापीठाने बाबासाहेबांवर गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. तो गौरवग्रंथ भेट देऊन बाबासाहेबांचा विचार मान्यवरांपर्यंत न पोहोचवता कुलगुरूंनी केलेली कृती डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधी जाणारी आहे. ज्ञानाचा प्रचार, प्रसार आणि विस्तार करणे हा विद्यापीठ स्थापनेचा हेतू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी संविधानाने शैक्षणिक संस्थांवर टाकली आहे. त्या हेतुलाच कुलगुरूंच्या या कृतीने तिलांजली मिळाली आहे
    डॉ. मारोती तेगमपुरे, समहासचिव, बामुक्टो
  • विद्यापीठात कोणत्याही कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित ग्रंथ पाहुण्यांना भेट द्यायची प्रथा आहे. ती प्रथा मोडित काढून एका विशिष्ट धर्माचे ग्रंथ उपराष्ट्रपतींना भेट देणे आणि एका विशिष्ट विचारसरणीचे खुलेआम उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. कुलगुरूंच्या या कृतीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.
    -डॉ. उमाकांत राठोड, अधिसभा सदस्य
  • कुलगुरूंनी उपराष्ट्रपतींना उपनिषद भेट द्यायला नको होते. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. या विद्यापीठाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असल्याने संविधानाची प्रत दिली असती तर ते औचित्यपूर्ण ठरले असते. परंतु कुलगुरूंनी औचित्याचा भंग केला. वेद, उपनिषदे हे राष्ट्रीय ग्रंथ नाहीत. धार्मिक ग्रंथ आहेत. कुलगुरूंनी त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात ते खुशाल द्यावे. दीक्षांत समारंभासारख्या कार्यक्रमात उपनिषद भेट देऊन कुलगुरूंनी चुक केली. उपनिषदे देऊन कुलगुरू विद्यापीठाला कोठे नेऊ इच्छित आहेत? कुलगुरूंना विद्यापीठात मनुवाद आणायचा आहे की काय? त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो.
    -डॉ. तुकाराम सराफ, भारतीय विद्यार्थी सेना
  • कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या काळात विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यापैकी एखादा ग्रंथ किंवा मराठवाड्याशी संबंधित एखादा ग्रंथ भेट दिला असता तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. उपनिषद भेट देऊन एका विशिष्ट विचारधारेचे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. कुलगुरूंच्या या कृतीचा मी निषेध करतो. सध्या विद्यापीठात जे वरिष्ठ आहेत त्यांची शक्ती हांजी हांजी आणि खुशमस्कऱ्या  करण्यातच वाया जात आहे. विद्यापीठात विद्यार्थी केंद्रीत काहीच राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचा विचारच केला जात नाही. दीक्षांत समारंभाचे प्रोटोकॉल पाळले गेले नाही. आगामी अधिसभेच्या बैठकीत कुलगुरूंना याचा जाब विचारू.
    डॉ. नरेंद्र काळे, अधिसभा सदस्य
संबंधित बातम्या

1 Comment

  • Virendra Ramanand Sharma

    उपनिषद हे जे ग्रंथ आहे ते वर सांगितल्याप्रमाणे परमात्मा आत्मा आणि जीव सजीव सृष्टी यांच्या बद्दल सखोल ज्ञानाचा भंडार आहे, कोणालाही जर सदर ग्रंथ भेट म्हणून दिले जात असतील तर त्याच्या त कोणताही गैरप्रकार होताना दिसत नाही या शुल्लक गोष्टीला मनुवाद आणि भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे अशी गरळ ओकून जर समाजात अस्थिरता निर्माण करून पाहत असाल तर आपला निषेध आहे, मी आपला निषेध व्यक्त करतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!