
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): विद्यापीठाची प्रमुख कार्यकारी व धोरणात्मक प्राधिकारी असलेल्या व्यवस्थापन परिषदेने सहा वर्षांपूर्वी सर्वानुमते मंजूर केलेला ठराव अद्याप अस्तित्वात असताना तो ठराव पायदळी तुडवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मराठी विभागप्रमुखपदी डॉ. रमेश जाधव यांची नियुक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. रमेश जाधव यांच्याबाबत मराठी विभागातील विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि सहकारी प्राध्यापकांनी तत्कालीन कुलगुरूंकडे असंख्य तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन कुलगुरूंनी डॉ. सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत आपला अहवाल कुलगुरूंकडे सादर केला होता.
तत्कालीन कुलगुरूंनी हा अहवाल ठराव क्रमांक ५५ द्वारे २८ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर ठेवला होता. त्यात डॉ. रमेश जाधव यांना मराठी विभागप्रमुखपदाचा कार्यभार कधीही सोपवण्यात येऊ नये, डॉ. रमेश जाधव यांची मराठी विषयाची गाईडशिप कायमची रद्द करण्यात यावी आणि डॉ. जाधव यांची घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता आणि या ठरावाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, असेही सर्वानुमते ठरले होते.
व्यवस्थापन परिषदेची २८ नोव्हेंबर २०१८ रोजीची ही बैठक संस्थगित झाल्यानंतर २ जानेवारी २०१९ रोजी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीतही डॉ. रमेश जाधव यांच्याबाबतचा अद्ययावत ठराव मांडण्यात आला होता. त्या ठरावाचा क्रमांकही ५५ होता. या ठरावातही आधीचे निर्णय कायम ठेवत डॉ. रमेश जाधव यांची घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजमध्ये २ एप्रिल २०१९ नंतर प्रतिनियुक्ती करण्यात यावी, अशी दुरूस्ती करण्यात आली होती.
व्यवस्थापन परिषदेच्या दोन्ही बैठकांत सर्वानुमते घेण्यात आलेला ठराव अद्याप अस्तित्वात असताना तो पायदळी तुडवत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. रमेश जाधव यांची मराठी भाषा व वाड्मय विभागप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. डॉ. रमेश जाधव यांनी सोमवारी डॉ. दासू वैद्य यांच्याकडून विभागप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. डॉ. रमेश जाधव हे १९९५ ते २००८ या काळात मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये ते विद्यापीठाच्या मराठी विभागात रूजू झाले. मिलिंद महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या मराठी विभागातील त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.

ठराव विखंडित करण्याचा अधिकार कुलपतींचा!
महाराष्ट्र सार्वजनिक विदयापीठ कायदा २०१६ मधील तरतुदींनुसार व्यवस्थापन परिषद ही विद्यापीठाची प्रमुख कार्यकारी आणि धोरणात्मक प्राधिकारी आहे. विद्यापीठाच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्राधिकरणाला विशेषत्वाने बहाल न केलेल्या कर्तव्यांचे पालन करण्यासाठी व्यवस्थापन परिषद जबाबदार आहे. याच कायद्यातील तरतुदींनुसार विद्यापीठाचे कुलपती (राज्यपाल) हे विद्यापीठाचे प्रमुख आहेत. कुलपती हेच विद्यापीठाच्या प्रशासकीय कायदेशीर बाबींवर देखरेख ठेवणारे सर्वोच्च अधिकारी आहेत. व्यवस्थापन परिषदेने घेतलेला निर्णय किंवा ठराव जर कायद्याच्या तरतुदींशी विसंगत, विद्यापीठाच्या हिताच्या विरूद्ध किंवा चुकीचा असेल तर तो निर्णय अथवा ठराव विखंडित करण्याचा, स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार कुलपतींना आहे.
व्यवस्थापन परिषदेने घेतलेले ठराव किंवा निर्णय हे कालमर्यादित किंवा त्या व्यवस्थापन परिषदेच्या कार्यकाळापुरते सीमित नसतात आणि त्यांचा प्रभाव हे ठराव किंवा निर्णय कुलपतींकडून विखंडित किंवा रद्द केले जाईपर्यंत अस्तित्वात राहतो. डॉ. रमेश जाधव यांच्याबाबत व्यवस्थापन परिषदेने घेतलेला निर्णय कुलपतींनी अद्याप विखंडित किंवा स्थगित केलेला नाही. म्हणजे तो अद्याप अस्तित्वात आहे. असे असतानाही कुलपतींच्या अधिकारांत अधिक्षेप करत कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. रमेश जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी मराठी विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि विद्यापीठाच्या प्राधिकार मंडळातील सदस्यांतील वाद काही नवे नाहीत. नुकत्याच झालेल्या अधिसभेच्या बैठकीत हे वाद चव्हाट्यावर आलेले असतानाच आता कुलगुरू डॉ. फुलारी यांनी विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदाच्या नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

