विद्यापीठाच्या राजकारणातही ‘५० खोके’चा पॅटर्नः एका-एका मतासाठी वाटले ५० हजार रुपये, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले पण…


औरंगाबादः महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी झालेली बंडखोरी आणि त्यानंतर घडून आलेल्या सत्तांतरानंतर ’५० खोके एकदम ओके’चा गुवाहटी पॅटर्न चांगलाच चर्चेत आला. आजही अधूनमधून त्याची चर्चा सुरूच असताना आज झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतही हाच पॅटर्न राबवला गेल्याचे पहायला मिळाले. व्यवस्थापन परिषदेवर निवडून जाण्यासाठी एका- एका मतासाठी तब्बल ५० हजार रुपये वाटण्यात आले. यातील एका सदस्याने पैसे घेऊन मतदान करण्यास नकार दिल्यामुळे त्यास धमकावण्यात आले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर त्या सदस्याच्या हातापाया पडून प्रकरण मिटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आज झालेली निवडणूक चुरशीची आणि अटीतटीची झाली. या निवडणुकीत काही जागांचे निकाल अनपेक्षित लागले. मतदारांचे पुरेसे संख्याबळ पाठिशी नसतानाही आ. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वातील उत्कर्ष पॅनलवर कुरघोडी करत विद्यापीठ विकास मंचने या निवडणुकीचा सामना ‘फिफ्टी-फिफ्टी’ने जिंकला.

आवश्य वाचाः विद्यापीठाच्या राजकारणात प्रथमच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’, ‘उत्कर्ष’चे २५ आणि ‘विकास मंच’चे २० सदस्य रात्रीपासून रिसॉर्टवर!

विधानसभा, महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत होतो तसाच साम,दाम, दंड आणि भेद या सर्वच अस्त्रांचा वापर  विद्यापीठाच्या या निवडणुकीत करण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत पहिल्यांदाच एका-एका मतासाठी ५०-५० हजार रुपये देऊ करण्यात आले. काही मतदारांनी निमूटपणे ही ऑफर स्वीकारून मतदान करण्यास होकार दिला तर काही जणांनी आपल्या मताशी ईमान राखण्याचा पवित्रा घेतला.

‘ढोबळ’मानाने विद्यापीठाच्या राजकारणात साम,दाम, दंड, भेद या अ’मंगळ’ नीतीचा अवलंब होत नाही, असा सर्वांचा समज होता. आजवर तसा अनुभव नसल्याने सगळेच जण या समजात होते. परंतु तो या निवडणुकीने फोल ठरवला आहे. एका एका मतासाठी पन्नास पन्नास हजारांची ऑफर आणि ती न स्वीकारणाऱ्या मतदारास धमक्यांचे प्रयोगही या निवडणुकीत झाले आहेत.

मतदारांचे पुरेसे संख्याबळ पाठिशी नसतानाही आपण निवडून येऊ असा ‘ढोबळ’ ठोकताळा बांधून ‘भगवान’ भरोसे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार नंतर अ‘मंगळा’शी संग करून आपले बस्तान ‘बसव’ण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचे अस्त्र सोबतीला घेऊन मतदाराच्या ‘गावी’त’ पोहोचले. त्याला ५० हजाराची ऑफर दिली. परंतु ‘सत्य’ हाच ‘धर्म’ असल्याने मताशी ‘अन्’ स्वतःशी बेईमानी आपल्याला ‘दूर’दूरपर्यंत शिवलेली नाही, असे सांगून त्या मतदाराने पन्नास हजार रुपये घेऊन मतदान करण्याची ऑफर धुडकावून लावल्यानंतर त्याला धमकावण्यात आले. विद्यापीठात कसा येतो तेच पाहून घेऊ, अशी धमकी त्याला देण्यात आली.

प्रकरण पोलिसांत गेले अन्…

ही धमकी मिळाल्यानंतर तो मतदार तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेल्यानंतर मात्र ऑफर देऊ करणाऱ्या उमेदवाराला आपले अ’मंगळ’ बिंग फुटणार याचा अंदाज आल्याने पाचावर धारण बसली आणि ‘सिंह’ बनून धमकावणाऱ्या त्या उमेदरावाच्या डोळ्यासमोर ‘भगवान’ तरळले. मग झाले गेले विसरून जाण्याचा पवित्रा घेत आधी ऑफर, मग धमकी देणाऱ्या या दबंगांनी नंतर मात्र हातापाया पडून त्याची मनधरणी केली आणि त्याला तिथून परत आणून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. घडलेला हा प्रकार कानोकानी चर्चेत आल्यानंतर विद्यापीठाच्या निवडणुकीतही ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’चा गुवाहटी पॅटर्न राबवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

क्रॉस व्होटिंगमुळे उत्कर्षला फटका

या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी विद्यापीठ उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचने या निवडणुकीत पहिल्यांदाच रिसॉर्ट पॉलिटिक्सचा प्रयोग केला. दोन्ही गटांनी आपले सदस्य कालपासूनच रिसॉर्टवर मुक्कामी ठेवले होते. ते थेट मतदानासाठी सभागृहात अवतरले तरीही या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले आणि त्याचा फटका आ. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वातील उत्कर्ष पॅनलला दोन जागांवर बसला. त्यामुळे त्यांच्या पॅनलचे पदवीधर गटातील उमेदवार सुनिल मगरे आणि संस्थाचालक गटातील उमेदवार देशमुख पराभूत झाले.

हे उमेदवार झाले विजयी

  • अधिसभेतून पदवीधर गटातून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या खुल्या प्रवर्गातील एका जागेसाठी उत्कर्ष पॅनलकडून सुनिल मगरे तर विद्यापीठ विकास मंचकडून योगिता होके पाटील मैदानात होत्या. या निवडणुकीत मगरे यांना ३४ मते मिळाली. तर योगिता होके पाटील यांना ३६ मते मिळाली. दोन मतांनी होके पाटील विजयी झाल्या. दत्तात्रय भांगे हे उत्कर्षचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
  • प्राचार्य गटातून डॉ. भारत खंदारे हे उत्कर्षकडून तर डॉ. विश्वास कंधारे हे विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार होते. डॉ. भारत खंदारे यांना ३७ तर डॉ. विश्वास कंधारे यांना ३३ मते मिळाली. ४ मते जास्तीची मिळवून डॉ. भारत खंदारे विजयी झाले. डॉ. गौतम पाटील हे बिनविरोध विजयी झाले.
  • संस्थाचालक गटातून विद्यापीठ विकास मंचकडून बस्वराज मंगरूळे तर उत्कर्षकडून गोविंद देशमुख उमेदवार होते. गोविंद देशमुख यांना ३० तर मंगरूळे यांना ४० मते मिळाली. तब्बल १० मते जास्तीची मिळवून मंगरूळे विजयी झाले. नितीन जाधव या गटातून बिनविरोध विजयी झाले.
  • अध्यापक गटातून उत्कर्षकडून डॉ. अंकुश कदम, विद्यापीठ विकास मंचकडून डॉ. भगवानसिंग ढोभाळ उमेदवार होते. डॉ. शंकर अंभोरे हेही उमेदवार होते. या गटात डॉ. कदम यांना ३४, डॉ. ढोभाळ यांना ३४ आणि डॉ. अंभोरे यांना १२ मते मिळाली. कदम आणि डोभाळ यांच्या मतांचा आकडा समान आल्याने पहिल्या पसंतीक्रमाची जास्त मते असलेले उमेदवार डॉ. कदम (३० मते) यांना विजयी घोषित करण्यात आले. डोभाळ यांना पहिल्या पसंतीची २८ मते मिळाली. या गटातून डॉ. रविकिरण सावंत हे बिनविरोध विजयी झाले.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!