PET-2024: पीएचडी प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींची चार सदस्यीय समितीमार्फत चौकशी, तुम्हीही लेखी स्वरुपात मांडू शकता समितीसमोर तुमचे गाऱ्हाणे!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये घेतलेल्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करताना झालेल्या त्रुटी आणि अनियमिततेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय काल (२६ मे) झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

पेट परीक्षेच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करताना गंभीर त्रुटी आणि अनियमितता झाल्याच्या असंख्य तक्रारी ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित विद्या शाखांचे अधिष्ठाता किंवा विद्यापीठातील कोणत्याच अधिकाऱ्यांनी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दादच दिली नाही.

जास्त गुण असूनही कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याचे नाव अंतिम निवड यादीत प्रसिद्ध करणे, आरक्षणाचा लाभ नाकारणे अशा असंख्य त्रुटी आणि अनियमितता पीएच.डी. प्रवेशासाठीची अंतिम निवड यादी जाहीर करताना झाल्या आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून आपले गाऱ्हाणेच ऐकून घेतले जात नसल्यामुळे समाजशास्त्र, अर्थशास्त्रासह काही विषयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने काही विषयांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगितीही दिली. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारींवर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचाः PET-2024 मध्ये गुणवाढ घोटाळा?, ‘ग्रिव्हन्स’मध्ये समाजकार्य विषयात ६३ हून अधिक परीक्षार्थ्यांचे वाढले ८ ते २४ गुण; नापासही झाले पास!

हाच धागा पकडून सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी पेट परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. काही ठराविक विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण देण्यात आले. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचा आरोप केला.

व्यवस्थापन परिषद सदस्यांचे आरोप आणि भरबैठकीत काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी अनियमिततेचे पुरावेच सादर केल्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी लोकप्रशासन विभागाचे विभागप्रमुख आणि माजी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. या समितीत अपर्णा पाटील, अंकुश कदम आणि योगिता होके पाटील यांचा समावेश आहे. या समितीला १० दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः विद्यापीठात ‘जादूचे प्रयोग’: यूजीसीचे नियम धाब्यावर बसवून दिली प्रा. डॉ. भास्कर साठे यांना दोन स्वतंत्र विषयात पीएचडीचे गाईड म्हणून मान्यता!

विद्यार्थ्यांनी आता काय करावे?

  • पीएच.डी. प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम निवड/गुणवत्ता यादीत आपल्यावर अन्याय झाला आहे, असे पेट परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांना वाटते, असे विद्यार्थी लेखी स्वरुपात या चौकशी समितीकडे आपली तक्रार मांडू शकतात.
  • विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, संपर्कासाठी पत्ता, मोबाइल क्रमांक, पेट परीक्षेचा बैठक क्रमांक आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सविस्तर तपशील पुराव्यांसह लेखी स्वरुपात मांडू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांची तक्रार परीक्षा भवनातील पीएच.डी. विभागात देऊन त्या तक्रारीची रितसर पोच घ्यावी.
  • विद्यार्थ्यांच्या प्राप्त झालेल्या तक्रारींची ही चौकशी समिती पडताळणी करणार आहे. पडताळणी प्रक्रियेदरम्यान ही चौकशी समिती संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष म्हणणे मांडण्यासाठीही बोलावू शकते. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करूनच ही समिती कुलगुरूंकडे शिफारशी करणार आहे. त्यामुळे अन्याय पीडित विद्यार्थी आजपासूनच परीक्षा भवनातील पीएच.डी. विभागात त्यांच्या लेखी तक्रारी दाखल करू शकतात, असे सांगण्यात आले.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!