पेन्शनधारकांनो सावधान! ऑनलाइन व्यवहाराचे मेसेज, फोन आल्यास प्रतिसाद देऊ नका; होऊ शकते फसगत!


मुंबई: सायबर भामट्यांनी आता पेन्शनधारकांकडे आपला मोर्चा वळवला असून पेन्शनधारकांना मोबाइलद्वारे संपर्क साधून थकीत रक्कम मिळवण्यासाठी ऑनलाइन रक्कम भरणा करण्याबाबत सांगितले जात आहे. कोषागार कार्यालयांमार्फत पेन्शनधारकांशी मोबाइलद्वारे संपर्कही साधला जात नाही आणि ऑनलाइन व्यवहार करण्याबाबत सूचितही केले जात नसल्यामुळे या भामटेगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईचे अधिदान व लेखा कार्यालय आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत,  प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही आणि ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. अधिदान व लेखा कार्यालय, कोषागार कार्यालयांमार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. अशा येणाऱ्या संदेशाबाबत सावध राहून कुणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारांतील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठवले जात नाही.

दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत कळविले जात नाही. अशा दूरध्वनी, भ्रमणध्वनीला प्रतिसाद देवून निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी.

अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *