एम. फिल. चे लघुशोधप्रबंध सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.फिलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे लघुशोधप्रबंध सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार एम.फिल. अभ्यासक्रम दोन वर्षापासून बंद करण्यात आला आहे. तथापि २०२०-२१ या अंतिम बॅचच्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही सदर तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कुलगुरू डॉ. येवले यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ च्या कलम (१२)(७) अन्वये विहित केल्यानुसार अधिष्ठाता मंडळ व विद्या परिषदेच्या वतीने एम.फिल. करत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा म्हणून लघुशोधप्रबंध सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अंतिम स्वरुपाची मुदतवाढ देण्यात आल्याचे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

विद्यापीठ मुख्य परिसर आणि उस्मानाबादेतील उपपरिसरात एम.फिल करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत विहित शुल्क आणि पाच हजार रुपये दंडाच्या रकमेसह लघुशोधप्रबंध सादर करावेत, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.ईश्वर मंझा यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!