नवी दिल्लीः मुलांवरील मोबाईल वापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाने १५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. शाळा व समुदायांच्या गटांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आणि चर्चासत्रेही घेतली जाणार आहेत. एखाद्या समाजाकडून मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली जाण्याची ही पहिलीच घटना आहे. दाऊदी बोहरा समाजाच्या या निर्णयाकडे दूरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणून पाहिले जात आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांना मोबाईलचे व्यसन जडल्यामुळे होणाऱ्या वाईट परिणामांची नेहमीच चर्चा होत असते. मोबाईलच्या अतिवापरामुळा लहान मुलांवर होणारे मानसिक आणि बौद्धिक दुष्परिणामही वारंवार चर्चिले जातात. त्यातून मार्ग काढण्यासाठी काही उपायही सूचविले जातात. परंतु एखाद्या समाजाने पुढाकार घेऊन विशिष्ट वयोगटातील मुलांवर मोबाईल वापरण्यास बंदी घातली जाण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
१५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचे वृत्त पुणे मिररने दिले आहे. दाऊदी बोहरा समाजाकडून जागतिकस्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे. मोबाईलच्या अतिवापराचा लहान मुलांच्या शारिरीक तसेच मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची बाब अधोरेखित करून दाऊदी बोहरा समाजाने हे पाऊल उचलले आहे.
लहान मुलांमध्ये मोबाईलच्या वापरामुळे सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. त्यातून सायबर बुलिंग, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. मोबाईलमुळे लहान मुलांना आक्षेपार्ह मजकूर सहज उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे मुले फसवणुकीच्या प्रकारांमध्ये अडकू लागली आहेत आणि त्यातून त्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी भूमिका मांडत दाऊदी बोहरा समाजाने हा निर्णय घेतला आहे.
मुलांना वाचन, मैदानी खेळाची सवय आणि कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवण्याची संधी मिळावी आणि त्यातून त्यांचा मानसिक विकास व्हावा, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचे दाऊदी बोहरा समाजाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वच वयोगटातील मुला-मुलींनी मोबाईलचा कमीत कमी वापर करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पण १५ वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्यावर बंदी असेल. या वयोगटातील मुला-मुलींना योग्य काय आणि अयोग्य काय याचे पुरेसे आकलन नसते, अशी दाऊदी बोहरा समाजाची भूमिका असल्याचे पुणे मिररच्या या वृत्तात म्हटले आहे.