छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दाम्पत्यावर अज्ञात तरूणांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) घडली. सोमवारी (३१ जुलै) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगरातील गल्ली नंबर ५ मध्ये ही घटना घडली. गोळीबार झाला तेव्हा हे दाम्पत्य घरात स्वयंपाकाची तयारी करत होते.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रभू आनंद अहिरे हे ६१ वर्षीय गृहस्थ आणि त्यांची पत्नी घरात स्वयंपाकाची तयारी करत असताना दोन अज्ञात तरूणांनी अचानक घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रभू हिरे औरंगाबाद महानगरपालिकेतून सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत.
हिरे दाम्पत्य नुकतेच हनुमाननगरात रहायला आले आहेत. हे दोघेही घरी असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रभू अहिरे यांची पत्नी घरात स्वयंपाकाची तयारी करत होत्या. घराचा दरवाजा उघडाच होता. तोंडाला रुमाला बांधलेल्या दोन अज्ञात तरूणांनी अहिरे यांच्या घरात प्रवेश केला.
अहिरे दाम्पत्याला काही कळण्याच्या आतच घरात घुसलेल्या दोघांपैकी एका तरूणाने प्रभू अहिरे यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. परंतु प्रसंगावधान राखून प्रभू अहिरे खाली बसले त्यामुळे गोळी बाजूला गेली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.
पहिली गोळी झाडल्यानंतर आणखी एख गोळी झाडण्यात आली. त्यातूनही हे दाम्पत्य बालंबाल बचावले. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून पसार झाले. विशेष म्हणजे हे दोन्ही हल्लेखोर चालत अहिरे यांच्या घरी आले होते. गोळीबार केल्यानंतरही ते आलेल्या मार्गानेच पायी पसार झाले.
गोळीबार करणारे दोन्ही तरूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, राजश्री आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात तरूणांनी झाडलेल्या दोन्ही गोळ्या घरात आढळून आल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.