कन्नड: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथील एका महाविद्यालयात बी. फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या वीस वर्षीय विद्यार्थ्यावर दोन जणांनी अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये शनिवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पीडित विद्यार्थी महाविद्यालयाच्या मैदानावर असलेल्या मोबाइल टॉवरजवळ मोबाईल पहात बसला होता. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कुंजखेडा येथील अज्जू मोहम्मद मोहम्मद शरीफ पठाण, (वय २६ ) व रईस खान उस्मान खान पठाण (वय २३) यांनी त्यास बळजबरी उचलून नेऊन अपहरण केले व हार्बेरियन गार्डनमध्ये नेऊन त्याच्यावर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला.
या दोन जणांनी या विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत तर केलेच शिवाय मोबाइलवर त्याचा व्हिडीओ चित्रिकरणही केले. पीडित विद्यार्थ्याला या दोन जणांनी चापट व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील अडीचशे रुपयेही काढून घेतले. या प्रकाराची कोठे तक्रार केल्यास चित्रित केलेला व्हिडीओ मित्र व नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकीही या दोन आरोपींनी पीडित विद्यार्थ्याला दिली.
या प्रकरणी अज्जू मोहम्मद मोहम्मद शरीफ पठाण, व रईस खान उस्मान खान पठाण या दोघांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), ११९(२), १२७(२), ११६(२), ३६२(२), ३६१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव हे करत आहेत. दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी दिली.