इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक: ‘या’ तारखेला जाहीर होणार पहिली गुणवत्ता यादी, वाचा संपूर्ण तपशील


पुणेः शिक्षण संचालनालयाने इयत्ता ११ वीच्या ऑनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सोमवारी रात्री उशिरा जाहीर केले. या सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीच्या प्रवेशाची पहिली गुणत्ता यादी २९ मे  सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार असून २९ मे रोजी सुरू होणारी पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया ३ जूनपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत २५ मेपर्यंत देण्याची आली होती. राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून नोंदणीची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आल्यामुळे नोंदणीची मुदत आज २६ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली होती. शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार २५ मेपर्यंत राज्यातील १२ लाख ४१ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी ११ वीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली होती.

सुधारित वेळापत्रकानुसार २६ मे ते २८ मेदरम्यान विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप (अलॉटमेंट प्रोसेस) केले जाणार आहे. पहिल्या फेरीच्या प्रवेशाची वाटप यादी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. याच दिवशी पहिल्या प्रवेश फेरीची कट ऑफ यादी पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे संदेशही पाठवले जाणार आहेत.

वाटप यादीनुसार विद्यार्थ्याला त्याच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याचे मान्य असल्यास विद्यार्थ्यांना २९ मे ते ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी महाविद्यालयात उपस्थित राहून विविहत शुल्क भरून प्रवेश करता येईल. याच कालावधीत महाविद्यालयाच्या लॉगइनवर प्रवेशाची पुष्टी, नकार किंवा प्रवेश रद्द करता येणार आहे.

नव्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीच्या प्रवेशाचे महाविद्यालयस्तरावरील कामकाज ४ जूनपर्यंत पूर्ण करायचे आहे. ५ जून रोजी डेटा प्रोसेसिंगचे काम होणार असून ५ जून रोजीच सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तर ६ जून रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन त्याप्रमाणे कामकाज करावे, असे आवाहन शिक्षण संचालनालयाच्या वतीने करण्यात आले असून इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि काही अडचण उद्धवल्यास support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर किंवा 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!