दिवसाआड पाणी मिळेल का? माहीत नाही, पण संभाजीनगरात उभारणार पाच नवीन प्रवेशद्वार; मंत्रिमंडळ बैठकीसमोर मनपाचा प्रस्ताव


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सध्या छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद)  सहा दिवसातून एकदा मिळणारे पाणी किमान दिवसाआड तरी मिळावे अशी शहरवासियांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी कधी पूर्ण होणार? शहरवासियांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात कधी पाणी मिळणार? याचे ठोस उत्तर कोणालाच माहीत नाही. पण तहानलेल्या शहरात पाच नवीन प्रवेशद्वार उभारण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला तर तहानलेल्या शहरवासियांच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या चुटकी सरशी सुटेल, अशी प्रशासनाची धारणा तर नाही ना? हे मात्र समजू शकले नाही.

 मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासप्रश्नांची ‘सखोल जाण’ असलेले पैठणचे ‘अभ्यासू’ आमदार आणिवराज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शनिवारी सर्व विभागांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत पाच नवीन प्रवेशद्वार बांधण्याचा प्रशासनाचा ‘दूरदर्शी’ आणि ‘महत्वाकांक्षी’ प्रस्ताव समोर आला.

मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष शिल्लक राहिल्याची नेहमीच ओरड होत असते. परंतु जेव्हा जेव्हा हा अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने मागण्या मांडण्याची आणि प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळते, तेव्हा नेमके कोणते प्रश्न रेटायचे आणि कोणते प्रस्ताव सादर करायचे? हेच येथील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना कळत नसल्याचे या प्रस्तावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, मनापा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह जलसंधारण कृषी, शिक्षण, सर्व विविध विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला.याच बैठकीत शहरात पाच नवीन प्रवेशद्वार निर्मितीच्या मागणी प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या या प्रस्तावाचा आढावा घेताना हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केल्यास शहराचे नेमके कोणते प्रश्न सुटतील? असा साधा सवालही भुमरे यांना विचारावा वाटला नाही. त्यामुळे अधिकारी ‘खुशी-खुशी’ हा प्रस्ताव सादर करून मोकळे झाले. 

५२ दरवाजांचे शहर अशी छत्रपती संभाजीनगरची (औरंगाबाद) ओळख आहे. आणखी पाच नवीन प्रवेशद्वार उभारल्यास ५७ दरवाजांचे शहर अशी या शहराची नवीन ओळख निर्माण होईल आणि ५२ दरवाजांचे शहर ही निजामकालीन ओळख आपोआपच पुसली जाईल, अशी हा प्रस्ताव तयार करण्यामागची एक धारणा असण्याची शक्यता आहे.

याच बैठकीत जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम, कृषी, रस्तेविकास, पर्यटन वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशन, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे भूमिगत गटार योजना, स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प याबाबत मागणी प्रस्ताव, जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाचे बळकटी करण, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!