मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींना हटवण्यासाठी अल्टिमेटम दिल्यानंतर आता छत्रपती संभाजी राजे यांनीही कोश्यारींना हटवले नाही तर उठाव होणारच असा इशारा केंद्र व राज्य सरकारला दिला आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कठोर पावले उचलली जातील, असे संकेत दिले आहेत.
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है…’ असे वादग्रस्त विधान केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल हे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. कोश्यारींवर टिकेची झोड उठवत त्यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. भगतिसंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहित धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! असे ट्विट करत संभाजीराजे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
उदयनराजेंचा उद्या ‘शिवसन्मानाचा निर्धारः’ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या विकृत प्रवृत्ती नेस्तनाबूत करण्यासाठी एकत्र येऊन शिवसन्मानाचा निर्धार करण्याची हाक भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उद्या, सोमवारी पुण्यात दुपारी १२ वाजता रेसीडेन्सी क्लब येथे शिवसन्मानाचा निर्धार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
ठाकरेंचा अल्टिमेटमः उद्धव ठाकरे यांनी याआधीच पत्रकार परिषद घेऊन कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दोन-चार दिवस वाट पाहू. त्यांना (कोश्यारींना) राज्यपालपदावरून हटवले नाही तर महाराष्ट्र बंद करू किंवा मोर्चा काढू, असा इशारा देतानाच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला पक्षभेद विसरून एकत्रितपणे विरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांनीही कोश्यारी हटावच्या मागणीसाठी सरकारला इशारा दिला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यपाल कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे.
शिवसेना आक्रमकः कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत खा. संजय राऊत यांनीही दिले आहेत. संभाजीराजे छत्रपती किंवा उदयनराजेंची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. महाविकास आघाडीने सातत्याने याविषयावर आवाज उठवण्याचे काम चालू ठेवले आहे. उद्धव ठाकरेंनी त्याबाबत अल्टिमेटम दिला आहे. मला वाटते त्याबाबत लवकरच कठोर पावले उचलण्याबाबत निर्णय होईल, असे राऊत म्हणाले.