मुंबईः एकनाथ शिंदेंच्या आडून शिवसेनेत फूट पाडून उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्वच पूर्णतः नाहीसे करण्याचे भाजपचे ‘मिशन ठाकरे’ सपशेल फेल गेले आहे. ‘मिशन ठाकरे’ भाजपवर बुमरँग झाले आणि साईड इफेक्ट्सच जास्त दिसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांची जनमानसातील क्रेझ कमी होण्यापेक्षा कितीतरी अधिक वाढली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सोबत असले तरी निवडणुका जिंकणे भाजपला अवघड वाटू लागले आहे. परिणामी आता महाविकास आघाडीत फूट पाडून आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ‘प्लान बी’ तयार केला असून लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात असा प्रस्तावच केंद्रीय पक्ष नेतृत्त्वाला पाठवला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार फोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रीय राजकीय अस्तित्व पूर्णतः संपेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपणच ‘एकमेव हिंदुत्ववादी’ पक्ष म्हणून मांड ठोकून बसू, हा भाजपचा अंदाज सपशेल फेल ठरला आहे.
४० आमदार, १३ खासदार फोडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकले. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. या निर्णयामुळे संपूर्ण शिवसेना ताब्यात आल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे गट किंवा भाजपच्या बाजूने म्हणावी तशी वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. उलट मिशन ठाकरे भाजपवरच बुमरँग होऊन उलटले आहे.
उद्धव ठाकरेंचे राजकीय अस्तित्व पूर्णतः संपवून महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी भाजपने केलेल्या उचापती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेल्या नाहीत. या उचापतींमुळे महाराष्ट्रातील जनमानसात भाजपच्या विरोधात प्रचंड नाराजीची लाट निर्माण झाली आहे आणि उद्धव ठाकरे यांची क्रेझ वाढली आहे.
हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षच संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात सर्वसामान्य जनतेत प्रचंड संताप आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत या उचापतींचा फटका बसण्याची भीती भाजपला आतापासूनच वाटू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेते धास्तावले आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्याची योजना महाविकास आघाडीने आधीच जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे गेली तर भाजपला निवडणुका जड जातील, याचा अंदाज राज्यातील भाजप नेत्यांना आताच आला असल्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी ‘प्लॉन बी’ केंद्रीय पक्ष नेतृत्त्वाकडे पाठवला आहे.
महाविकास आघाडीची एकत्रित शक्ती आणि उद्धव ठाकरेंची वाढलेली क्रेझ या दोन आव्हानांचा सामना करून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकत्रच घ्यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश भाजपने केंद्रीय पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे.
या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास अत्यंत रंगतदार परिस्थितीत निर्माण होईल. या दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात बेबनाव होऊन या आघाडीत फूट पडेल आणि महाविकास आघाडीत पडलेल्या फुटीचा फायदा भाजपला होईल, असे या प्रस्तावात म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रस्तावित आहे तर एप्रिल-मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका प्रस्तावित आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक घेतल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि प्रतिमेचा भाजपला फायदा करून घेता येईल.
महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीपेक्षा मोदींचा करिश्मा वरचढ ठरेल, असा ठोकताळा एकत्रित निवडणुका घेण्याच्या प्रस्तावात मांडण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये न घेता ती लोकसभा निवडणुकीबरोबर म्हणजेच एप्रिल-मे २०२४ मध्येच घ्यावी, यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेते आग्रही आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्यास जागा वाटपाच्या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात वाद निर्माण होतील. अनेक जागांवर तिन्ही पक्ष लढण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडीत फूट पडून तिन्ही पक्ष वेगवेगळे होतील. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपात झुकते माप द्यायला तयार होणार नाहीत, असाही भाजपचा अंदाज आहे. प्रदेश भाजपच्या या प्रस्तावावर केंद्रीय पक्ष नेतृत्त्व विचार करत असल्याचे सांगण्यात येते.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न बुमरँग झाला आहे. शिंदेंच्या आडून ठाकरेंचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे कारस्थान सपशेल फेल गेल्याची जाणीव झाल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर लोकानुनयाच्या घोषणा आणि तरतुदी करण्यात आल्या.
प्रत्येक घटकाला खूश करून भाजपविरोधात निर्माण झालेली नाराजी पुसण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्या प्रयत्नांचाही फारसा इफेक्ट होताना दिसत नसल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपने केंद्रीय पक्ष नेतृत्वाकडे हा प्रस्ताव पाठवला असून महाविकास आघाडीत फूट पाडून निवडणुका जिंकणे हाच त्यामागचा हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.