भाजप अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत, विधानसभा निवडणुकीत स्वबळाची चाचपणी; शिंदे सेनेसाठीही धोक्याची घंटा


मुंबईः लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी सुमार राहिल्यामुळे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळेच निवडणुकीत फटका बसल्याची पक्की धारणा झाल्यामुळे भाजप आता अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने भाजप नेतृत्वाने चाचपणी सुरू केली  असून त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही टेन्शन वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागा लढवल्या. त्यापैकी ९ जागा जिंकल्या. शिंदे सेनेने १५ जागा लढवल्या आणि ७ जागा जिंकल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा लढवल्या आणि केवळ एकच जागा जिंकली. शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षाही चांगला आहे. तरीही भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरु केली आहे.

आज मुंबईत भाजपची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवता येईल का? याबाबतची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची चाचपणी केली जात असून त्यासाठी भाजपकडून अंतर्गत सर्वेक्षण केले जात आहे. स्वबळावर निवडणूक लढवल्यास त्याचा कितपत फायदा किंवा तोटा होऊ शकतो, याचा अंदाज भाजपकडून घेतला जात आहे. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची चांगलीच अडचण होऊ शकते.

 राज्यात महाविकास आघाडीचे बळ वाढले आहे. लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी यशामुळे महाविकास आघाडीचा विश्वासही दुणावला आहे. अशा स्थितीत भाजपने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा निभाव लागणे अवघड होऊन बसणार आहे.

भाजपने स्वबळावल लढण्याचा निर्णय घेतलाच तर या दोन पक्षांतील काही आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. तर पक्षफुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कुठलीही टिका-टिप्पणी न करता तटस्थ भूमिका घेतलेले आमदार घरवापसी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार गटाशी हातमिळवणी करण्याचा भाजपचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) पटललेला नाही. भाजप आणि आरएसएसच्या केडरची भूमिका अजित पवारविरोधीच राहिली आहे. भाजपने अजित पवारांसोबत युती करताना भाजप-आरएसएसच्या विचारधारेलाच तिलांजली दिल्याची भावनाही या केडरमध्ये आहे. त्यातच अजित पवारांना उपमुख्यमंत्री करून या भावनेवर मीठ चोळण्यात आले आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याचे वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

भाजपशी संबंधित संघटना, पाठीराखे सक्रीय

अजित पवारांसोबत राहिल्यास नुकसानच होईल, अशी भावना भाजप नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे अजित पवारांना दूर करण्यासाठी भाजपशी संबंधित संघटना आणि त्यांचे पाठीराखे कामाला लागले आहेत.

आरएसएसमध्ये हयात घालवलेले स्वयंसेवक रतन शारादा यांनी नुकताच आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये एक लेख लिहून अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांमुळे भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसल्याचे विश्लेषण शारदा यांनी केले आहे. विशेष म्हणजे आरएसएसकडून ही टीका होत असताना भाजपच्या एकही नेता अजित पवारांची पाठराखण करायला पुढे आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या परवानगीनेच हे सगळे सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

ओझे का बाळगायचे?

अजित पवार हे भाजपच्या उपयोगाचे नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अजित पवारांशी युती तोडल्यास भाजप हा वापर करून फेकून देणारा पक्ष आहे, असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. असा संदेश जाणे महागात पडू शकते आणि अजित पवारांना सोबत ठेवल्यास ते ओझे ठरू शकतात. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काय करायचे? हे भाजपला लवकर ठरवावे लागेल, असे भाजपच्या एका अन्य नेत्याचे म्हणणे आहे.

आतापासूनच अंतर राखणे सुरू

भाजपने आतापासूनच अजित पवार आणि त्यांच्या पक्षाशी अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी सकाळी विधान भवनात येऊन राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते-पदाधिकारी होते. भाजप आणि शिंदे सेनेचा एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *