पाटणाः गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता ते पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहेत. लवकरच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे.
राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. मी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील विद्यमान सरकार विसर्जित करावे, असेही मी राज्यपालांना सांगितले आहे. मला महागठबंधन तोडण्याबाबत चारही बाजूंनी सल्ले मिळत होते. त्यानुसार मी आज राजीनामा दिला, असे नितीश कुमार म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. नितीश कुमार आता भाजपसोबत सत्ता स्थापन करतील. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी चार वाजता त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजीनामा देण्याची वेळ का आली?
तुमच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ का आली? असा थेट प्रश्न पत्रकारांनी नितीश कुमार यांना विचारला असता ते म्हणाले की, राज्यकारभार योग्यरितीने चालत नव्हता. त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला अनेकदा विचारले होते. परंतु मी बोलणे बंद केले होते. आम्ही सर्व परिस्थिती पहात होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आणि आमचे सरकार विसर्जित केले आहे, असे नितीश कुमार म्हणाले.
‘इंडिया’ला मोठा धक्का
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमारही भाजपसोबत जात असल्यामुळे हा इंडिया आघाडीला मोठा धक्का मानण्यात येत आहे. नितीश कुमार यांचे राजकारणच बेभरवश्याचे आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची मोट बांधली. इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारमध्येच झाली होती. इंडिया आघाडीचा प्रधानमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असतानाच त्यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.