विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, एमपीएससीची रविवारची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी मात्र आंदोलनावर ठाम


मुंबई: आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आज गुरूवारी झालेल्या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे.

राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ रविवार, २५ ऑगस्ट रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात आज (२२ ऑगस्ट) झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवारी (२५ ऑगस्ट) रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळवले आहे.

 दरम्यान, एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचाही समावेश करावा, या २५८ जागांसाठी परीक्षा घेण्याची अधिसूचना काढावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे कृषी विभागाचा निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. तर शरद पवार यांनीही राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरेन असा इशारा शरद पवार यांनी बुधवारी दिला होता.

दरम्यान, आज एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ‘तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा’  असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांच्या आणखीही मागण्या

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा, नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करू नका, परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिने वेळ द्या, नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत, त्यामुळे या अभ्यासक्रमात सुधारणा करा, अशाही आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!