भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा, पहलगाम हल्ल्यावरून मोदी सरकारला सवाल करणे पडले महागात!


लखनऊ/नवी दिल्लीः प्रसिद्ध भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेहासिंह राठौरने सोशल मीडियावर पोस्ट करून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले होते आणि काही सवाल उभे केले होते. त्यावरून लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. नेहासिंह राठौर देशविरोधी वक्तव्य करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहे, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

नेहाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यान्वये अनेक गंभीर स्वरुपाची कलमे लावण्यात आली आहेत. त्यात देशद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. नेहासिंह राठौर एका समुदायाला धर्माच्या आधारावर भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशाची एकता आणि शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट चुकीच्या आहेत. या पोस्ट देशाच्या अखंडतेला कमकुवत करतात. लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर नेहा लोकांना भडकवू शकते, असे फिर्यादी अभय प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.

नेहासिंह राठौर भारतातील कवी समुदाय आणि भारताची प्रतिष्ठेचा धक्का पोहोचवत आहे. नेहासिंहच्या सोशल मीडिया पोस्टचा पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी वापर केला जात आहे, असेही या एफआयआरमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एफआयआरमध्ये विविध ११ कलमे लावण्यात आली आहेत. त्यात देशद्रोह, समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आणणे आदी कलमांचा समावेश आहे, असे हजरतगंज ठाण्याचे एसएचओ विक्रम सिंह यांनी सांगितले.

नेहासिंह राठौरने सोशल मीडिया नुकत्याच केलेल्या विधानांमुळे हे सारे प्रकरण सुरू झाले आहे. नेहासिंहने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून अनेकवेळा मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. नेहाने याबाबत सातत्याने व्हिडीओ शेअर केले होते. त्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांवरून नेहाने अनेक सवाल उपस्थित केले होते.

पहलगामचा दहशतवादी हल्ला हा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेची चुक असल्याचे नेहासिंह राठौरने म्हटले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आता बिहारमध्ये पहलगाम हल्ल्याच्या नावाने मते मागतील, असे नेहासिंहने म्हटले होते. प्रधानमंत्री मोदींच्या ’५६ इंचाची छाती’च्या विधानाचीही खिल्ली उडवली होती. एवढी शक्ती असूनही लोक का मरत आहेत? असा सवाल नेहाने केला होता. आता आम्ही काय मोहम्मद अली जिनांना प्रश्न विचारायचे काय?, अशी खिल्लीही उडवली होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आता पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा वापर बिहारच्या निवडणुकीत मते मागण्यासाठी करतील. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही असेच झाले होते, असा दावा नेहासिंहने केला होता. पुलवामा दहशतवादी हल्ला २०१९ मध्ये झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

जी व्यक्ती रशिया-युक्रेन युद्द थांबवू शकते, ती व्यक्ती आपल्या देशातील दहशतवादी हल्ले रोखू शकली नाही, असेही नेहासिंहने म्हटले होते. नेहासिंहने प्रधानमंत्री मोदींच्या समर्थकांवरही टिकास्त्र सोडले होते. मोदी समर्थकांनी नेहासिंहला या मुद्द्याचे राजकारण करू नका, असा सल्ला दिला होता. त्यावर नेहाने उत्तर दिले होते की, आता मी सरकारला कोणते सवाल करू? शिक्षण आणि आरोग्याचे मुद्दे आता जुने झाले आहेत. राष्ट्रवाद आणि हिंदू-मुस्लिमांचे राजकारण केले जाऊनही लोग मारत आहेत.

नेहासिंहच्या या सोशल मीडिया पोस्ट पाकिस्तानमद्ये व्हायरल झाल्या. पाकिस्तानी पत्रकारांच्या समूहाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या पोस्ट सातत्याने रिपोस्ट केल्या. ‘ पहलगाम हल्ल्याचा वापर मोदी सरकार बिहार निवडणुकीत मते मागण्यासाठी करेल असे सांगून या मुलीने पहलगाम हल्ल्यामागचे सत्य उघड केले आहे,’ असे पाकिस्तानी हँडल्सनी म्हटले होते. त्यानंतर नेहावर प्रचंड टिका झाली आणि ती ट्रोलही झाली.

एफआयआर दाखल होताच नेहाची तीव्र प्रतिक्रिया

एफआयआर दाखल झाल्यावरही नेहासिंहने लगेच प्रतिक्रिया दिली. माझ्याविरुद्ध एफआयआर झालाच पाहिजे. एक साधारण मुलगी एवढ्या मोठ्या लोकशाहीत प्रश्न कसे काय विचारू शकते? असे म्हणत नेहासिंहने प्रधानमंत्री मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवादही दिले आहेत. नेहाच्या या पोस्टवरूनही वाद निर्माण झाला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत सरकारने काय केले? माझ्याविरुद्ध एफआयआर? अरे दम असेल तर जा… दहशतवाद्यांचे सिर कलम करून आणा! माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करून सरकार मूळ मुद्यावरून लक्ष विचलित करू पहात आहे… ही बाब समजणे एवढे कठीण आहे का? असे नेहाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नेहाने एकानंतर एक अनेक पोस्ट करत पुन्हा ललकारण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेला सवाल करणे ही बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे, असेही नेहासिंहने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!