
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या (एसएससी) परीक्षा केंद्रावर भरारी पथक असल्याची बतावणी करून दहा ते पंधरा जणांचा जत्था घेऊन अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश ८ वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी हर्सूल पोलिसांना दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे ‘मर्जी’तील पत्रकारांना सोबत घेऊन चमकोगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबरच तो ‘मर्जी’तील पत्रकारही कायदेशीर कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओहोर- जटवाडा येथील राजर्षि शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला फेब्रुवारी-मार्च २०२५ चे इयत्ता दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र मंजूर झाले होते. या परीक्षा केंद्रावर ११ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान इयत्ता बारावीच्या तर २१ फेब्रुवारी ते १७ मार्च य कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या.
इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असताना पदमपुऱ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक ‘भाई’चंद्रकांत चव्हाण यांनी भरारी पथक असल्याचे भासवून १५ ते २१ जणांनासोबत घेऊन या परीक्षा केंद्रावर अनधिकृतपणे प्रवेश केला. परीक्षा केंद्राचे संचालक गोपाल जाधव यांनी त्यांना ओळखपत्र मागितले असता त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला. विशेष म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता परीक्षा केंद्रात घुसलेल्या या लोकांनी पेपर संपल्यानंतर पर्यवेक्षक बाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका जमा करून त्यावर खानाखुणा केल्या. त्यावर केंद्र संचालकांनी आक्षेप घेतल्यानंतर संस्थेचा काटा काढायचा असतो, असे उत्तर या घुसखोरांनी दिल्याची फौजदारी स्वरूपाची तक्रार गोपाल जाधव यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली होती.
तत्पूर्वी केंद्र संचालक जाधव यांनी संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या चौकशीत चव्हाण यांनी गुन्हा केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १८ मार्च रोजी जाधव यांना फिर्याद देण्यास आदेश दिले होते.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केंद्र संचालक जाधव यांनी २४ मार्च रोजी हर्सूल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी या फिर्यादीची दखल न घेतल्यामुळे २२ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. पण या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही.
हर्सूल पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तांनी दखल न घेतल्यामुळे केंद्र संचालक जाधव यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी तक्रार अर्ज केला होता. ही फौजदारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियमाच्या कलम १७५ (३) अन्वये हर्सूल पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याचे म्हणणे मागवले. चौकशी समितीच्या अहवालात चंद्रकांत चव्हाण हे अर्धा दिवस कर्तव्यावर हजर नव्हते आणि ते कुठल्याही आदेशाशिवाय या परीक्षा केंद्रावर गेले होते, आणि या ‘कथित’ भरारी पथकाने प्रश्नपत्रिकेच्या पर्यायी उत्तरात खुणा केल्याचेही स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.
चंद्रकांत चव्हाण हे अनधिकृतपणे १५ ते २१ जणांना सोबत घेऊन या परीक्षा केंद्रात घुसले. घुसखोरांमध्ये काही पत्रकारांचाही समावेश होता. या पत्रकारांनी चंद्रकांत चव्हाण यांच्या ‘भाईगिरी’च्या जोरावरच या परीक्षा केंद्रात घुसून कथित ‘स्टिंग ऑपरेशन’चे रिपोर्ताज प्रसिद्ध केले होते. परंतु चंद्रकांत चव्हाण यांचा हेतू या शाळेची बदनामी करणे आणि ही शाळा बंद पाडणे एवढाच होता, असे केंद्र संचालक जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. केंद्र संचालक जाधव यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिधिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांस प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमाच्या कलम ७ व ८ नुसार हर्सूल पोलिसांना कार्यवाही करणे अपेक्षित होते आणि प्रश्नपत्रिकेच्या पर्यायी उत्तरावर खाणाखुना केल्याप्रकरणीही कार्यवाही करणे अपेक्षित असताना हर्सूल पोलिसांनी तसे न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
चव्हाण आणि कंपनीने केलेला प्रताप हा महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिधिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ च्या कलम ९ प्रमाणे दखल पात्र गुन्हे असल्याचे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने चव्हाण आणि कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कलम १७५ (१) प्रमाणे चौकशीचे आदेश दिले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज का डिलिट केले?
ज्या दिवशी चंद्रकांत चव्हाण ओहोरच्या परीक्षा केंद्रावर घुसले त्यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार रमेश मुनलोडही होते. केंद्र संचालकांनी त्यांना ओळख विचारली असता त्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याबरोबरच जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. केंद्र संचालकांनी अभिप्राय पुस्तिकेवर नोंद करण्याची विनंती केल्यावर तुमच्याकडे काहीच घडले नाही, असे त्यांनी सांगितले. नंतर चंद्रकांत चव्हाण आणि तहसीलदार मुनलोड यांनी सीसीटीव्ही तंत्रज्ञ बोलावून सीसीटीव्ही फुटेजचा सर्व डाटा डिलिट करून टाकला, अशी केंद्र संचालक जाधव यांची तक्रार आहे. परंतु सीसीटीव्ही फुटेजचा डाटा डिलिट केला असला तरी पोर्टेबल कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार चित्रित झाल्याचे केंद्र संचालक जाधव यांनी हर्सूल पोलिस ठाणे व पोलिस आयुक्तांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या परीक्षा केंद्रावर खरेच जर गैरप्रकार होत होता आणि चंद्रकांत चव्हाण हे अधिकृत भरारी पथकात होते तर सीसीटीव्ही फुजेट डिलिट करण्याची घाई त्यांनी का केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोण आहेत ‘भाई’ चंद्रकांत चव्हाण?
चंद्रकांत सोपानराव चव्हाण हे मुकुंदवाडीतील राजर्षि शाही विद्यालयात अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहेत. सध्या ते पदमपुरा येथील शासकीय विद्यानिकेतन येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. स्वतःला ‘भाई’ म्हणवून घेणारे चंद्रकांत चव्हाण यांनी शहरातील व शहराबाहेरील नामवंत संस्थांना कारवाईच्या धमक्या देऊन उपोषणे, धरणे, आंदोलने केलेली आहेत. असा जाधव यांचा आरोप आहे. मराठवाडा शिक्षक संघटना या संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून ते वावरत असले तरी या संघटनेला शासन मान्यता आहे की नाही, याचा कोणताच उल्लेख त्यांच्या लेटरपॅडवर नाही. चंद्रकांत चव्हाण हे शाळांना ब्लॅकमेल करतात, असाही त्यांच्यावर आरोप आहे.


चंद्रकांत चव्हाण हे शिक्षकांचे प्रामाणिक नेतृत्व आहेत. कुठल्या एका केंद्र संचालकांचे म्हणणे तथ्य म्हणून समजणे योग्य ठरणार नाही.