अमरावतीः यंदा हनुमान जंयती आणि आपला वाढदिवस एकाच तारखेला आला आहे, असे सांगणे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या चांगलेच अंगलट येताना दिसत आहे. खा. नवनीत राणा यांच्या दोन वेगवेगळ्या जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवण्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी केला आहे. खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्यामुळेच शोलेतील बसंतीप्रमाणे त्यांना दुसऱ्याच्या तालावर नाचावे लागत असल्याचेही खराटे म्हणाले.
हनुमान जयंती आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी आला असल्याचे खा. नवनीत राणा आनंदाने सांगत आहेत. यंदा ६ एप्रिलला हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीबरोबरच खा. राणा त्यांच्या वाढदिवसाचा उदोउदो करत आहेत. खा. नवनीत राणा यांच्या शाळा सोडल्याच्या एका दाखल्यावर (टीसी) त्यांची जन्मतारीख ६ एप्रिल १९८५ आहे आणि या टीसीवर त्यांच्या जातीचा उल्लेख शीख असा आहे, असा आरोप खराटे यांनी केला.
खा. नवनीत राणा यांनी जातीच्या खोट्या प्रमाणपत्रासाठी जी टीसी जोडली, त्या टीसीवर त्यांची जन्मतारीख १५ एप्रिल १९८५ अशी आहे आणि या टीसीवर त्यांच्या जातीचा उल्लेख मोची असा आहे. त्यामुळे खा. नवनीत राणा यांची खरी जन्मतारीख आणि त्यांची खरी जात कोणती? असा प्रश्न निर्माण झाला असून यावर खा. नवनीत राणा यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी खराटे यांनी केली आहे.
नवनीत राणा हिंदू शेरनी कशा?
आम्हाला कोणत्याही जातीधर्माचा अपमान करायचा नाही. मात्र सदैव हिंदुत्वासाठी उभे ठाकणारे आमचे नेते उद्धव ठाकरे यांचा खा.नवनीत राणा यांनी भाईजान असा उल्लेख करणे योग्य नाही. अमरावती शहरातील मुस्लिमांच्या अनेक उत्सवात राणा दाम्पत्य मुस्लिमांच्या पेहरावात सहभागी झाले आहेत. मुस्लिमांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचापेहराव घालण्याची नौटंकी राणा दाम्पत्यच करू शकतात. स्वार्थासाठी सतत नौटंकी करणाऱ्या नवनीत राणा या हिंदू शेरनी कशा? असा सवालही खराटे यांनी केला आहे.
गब्बरच्या इशाऱ्यावर नाचते बसंती!
यावेळी सुनिल खराटे यांनी ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटाचे उदाहरण देत खा. नवनीत राणा यांच्यावर टिकास्त्र सोडले. शोले सिनेमात विरुला दोराने बांधल्यावर त्याच्यासमोर काचा टाकून गब्बर त्यावर बंसतीला नाचायला लावतो. गब्बरच्या इशाऱ्यावर बसंती नाचायला लागते. अगदी तसाच प्रकार सध्या नवनीत राणा यांच्याबाबत महाराष्ट्रात सुरू आहे, असा आरोप खराटे यांनी केला आहे.
खा. नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणे भाग पडत आहे. नवनीत राणा या खरोखर खऱ्या आहेत, तर मग त्यांच्या जातप्रमाणपत्राच्या प्रकरणात त्यांच्या वडिलांना न्यायालयाने फरार घोषित का केले? असा सवालही खराटे यांनी उपस्थित केला आहे.