छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): विश्वस्त मंडळातील लाथाळ्यांमुळे लयास जाण्याच्या मार्गावर असलेली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस) वाचवण्यासाठी संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आता आंबेडकरी समाज एकवटला असून पीईएस बचावच्या मागणीसाठी येत्या बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा धडकणार आहे. या महामोर्चासाठी आंबेडकरी तरूण जय्यत तयारीला लागले आहेत.
बाबासाहेबांची पीईएस वाचली पाहिजे आणि या संस्थेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली पाहिजे, या भूमिकेतून मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे मागील काही दिवसात संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक यांच्या अनेक बैठका पार पडल्या त्यातून पीईएस बचाव मोर्चा काढून संस्थेच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला हा मोर्चा बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता मिलिंद महाविद्यालयातून निघून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मिलिंद महाविद्यालय ते मिल कॉर्नरमार्गे टाऊन हॉल उड्डाणपूल ते किलेअर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाईल.
वाचा न्यूजटाऊनचे विशेषवृत्तः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी; ‘महाउपासका’कडून ‘रेशीम’ उपासना?
मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात २००२ पासून पीईएसच्या विश्वस्त मंडळाचा वाद सुरू असून हा वाद सतत पेटत रहावा यासाठी सत्तेतील विविध पक्षांनी प्रयत्न केले. आता तर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या हस्तकांनी ही संस्था गिळंकृत करण्याचा डाव आखल्याने ही संस्था वाचवण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी व संस्थेच्या हितचिंतकांनी एकत्र येत या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाचवणे, तिच्या विकासात हात भार लावून या संस्थेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य असून पीईएसच्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अभियान राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
१३ सप्टेंबर रोजीच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे. ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कॉर्नर बैठकांद्वारे स्वाक्षऱ्या गोळा करण्यात येत असून मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून रविवारी मिलिंद महाविद्यालय येथून ५०० दुचाकी वाहनांची रॅली काढून शहरभर जनजागृती करण्यात आली.
या महामोर्चाच्या माध्यमातून डॉ. एस. पी. गायकवाड यांच्यासारख्या अक्षम व्यक्तीने स्वतःहून संस्थेचा राजीनामा द्यावा, जे लोक संस्थेच्या विकासाबाबत गंभीर नाहीत अश्यांनी संस्थेच्या विश्वस्त पदावर केलेले दावे मागे घ्यावेत व संस्था वादमुक्त करावी, संस्थेच्या नागसेनवन परिसरातील अतिक्रमण हटवावीत, अनेक वर्षांपासून प्रलंबित खटले निकाली काढण्यात यावेत, विविध महाविद्यालयात डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केलेला आर्थिक भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीने केलेल्या नियुक्त्या यांची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, मिलकॉर्नर ते मिलिंद चौक, मिलिंद चौक ते विद्यापीठ गेट तसेच पाणचक्की येथील रस्ते संस्थेच्या जागेतून गेले असताना अद्यापही त्याचा मोबदला संस्थेला मिळाला नसल्याने तो देण्यात यावा अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.
या मोर्चाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाणार असून या निवेदनासोबत नागरिकांच्या सुमारे ४० हजार स्वाक्षऱ्या जोडण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या गोळा करण्यासाठी आंबेडकरी तरूण स्वयंस्फूर्तीने वस्त्यावस्त्यांमध्ये फिरत आहेत. मोर्चात जास्तीत जास्त जनतेला सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती करत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या पीईएस बचावसाठी निघणारा हा महामोर्चा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.