उत्तरकाशी जिल्ह्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील १७१ पर्यटकांशी संपर्क, सर्वजण सुखरूप


मुंबई: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तिथे अडकलेल्या १७१ पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सर्व सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरित एक पर्यटक कृतिका जैन यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) आणि संबंधित यंत्रणेने दिली.
महाराष्ट्रातील विविध भागांतील सर्व पर्यटक प्रवासी सुखरूप आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये काल दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली.
परिसरातील रस्ते देखील पूर्ववत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय टम्टा यांचीही महाजन यांनी भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला. राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात अडकलेल्या एकूण १७२ पर्यटकांपैकी १४७ पर्यटक सुखरूप आहेत. त्यापैकी (६७ पर्यटक मातलीत, ६ पर्यटक जॉली ग्रॅन्ट येथे तर ७४ उत्तरकाशी येथे आहेत. सुरक्षित असलेल्या पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरु केली आहे. २५ पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असून त्यांना एअर लिफ्ट करुन मताली येथील आयटीबीपी कॅम्पमध्ये हलविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष उत्तराखंडच्या आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, डीईओसी-उत्तरकाशी, आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राशी सातत्याने संपर्कात आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने त्यासंबंधी उपाययोजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत.
संचालक (आपत्ती व्यवस्थापन) उत्तराखंड यांचेकडून संचालक (आपत्ती व्यवस्थापन) मंत्रालय, मुंबई यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार बचाव कार्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.
२४ पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन मताली येथे हलविण्यात येणार आहे. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅड यांचे दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी १० आयटीबीपी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम ३० यात्रेकरूंना संरक्षण देणार आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथके धराली येथे कार्यरत आहेत.
संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. एनईआरसी नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून त्यांचे स्थलांतर अपेक्षित आहे.
उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी आयजीपी राजीव स्वरूप यांच्याद्वारे उपग्रह फोन तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्र बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरवण्यासाठी कार्यरत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!