मुंबई: मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे.प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या २० नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, ३६० खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील ३०६ खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि १५२ खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली.
सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला आहे, असे मोदी म्हणाले.
देशाची नवी ओळख जगामध्ये आता अधिक ठळक होत आहे. विकसित भारताची उत्सुकता आता केवळ देशातच नव्हे, तर जगातही आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. याच सकारात्मकता आणि सामर्थ्याचा उपयोग करून गतिशील विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या देशात आधुनिक दळणवळणाकडे लक्ष दिले जात आहे. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या शहरांच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील सामान्य मुंबईकरांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली.
रेल्वेचे आधुनिकीकरण मिशन मोडवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेची प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच, त्याच ठिकाणी बस, टॅक्सी आदी सुविधाही असाव्यात यासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी हब तयार करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार-शिंदेः मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगाने धावू शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईकरांचे जगणे सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर २०१५ मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रधानमंत्री मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
विकासाला मानवी चेहरा देणारः गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची साथ कधीही सोडत नाही हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभिकरण हे सर्वच आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार आहे, असेही शिंदे म्हणाले.
मुंबईच्या बाहेरही प्रधानमंत्री स्वनिधी योजनाः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला मध्यंतरी खीळ बसली होती. पुन्हा राज्य शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबईच्या बाहेर राज्याच्या इतर भागातही आगामी काळात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.