पुणेः तलाठी परीक्षेत तब्बल ११४ प्रश्न चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले असून या चुकीच्या प्रश्नांसाठी परीक्षार्थ्यांना पूर्ण गुण देण्यात येणार असल्याचे तलाठी परीक्षा राज्य समन्वय समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात तलाठ्यांची ४ हजार ४४६ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीला अनुसरून राज्यातील १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज केले होते.
ही पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे भूमी अभिलेख विभागामार्फत तीन टप्प्यात ५७ सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली होती.
परीक्षा संपल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने प्रश्नसूचीवर २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात आक्षेप मागवले होते. प्रश्नसूचीवर तब्बल १६ हजार २०५ आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ७२ आक्षेप मान्य करण्यात आले. त्यानुसार ३२ प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले आणि ११४ प्रश्न किंवा त्यांची उत्तरे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले.
तलाठी परीक्षा राज्य समन्वय समितीने तलाठी परीक्षेतील उमेदवारांना या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आल्यास त्याचे सरसकट गुण देण्याची बाब अशाप्रकारे तलाठी परीक्षेतील उमेदवारांच्या चांगलीच पथ्यावर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता भूमी अभिलेख विभागाने गुणसूची तयार केली असून अंतिम निर्देश प्राप्त झाल्यानंतर ही गुणसूची जाहीर केली जाणार आहे. गुणसूची जाहीर झाल्यानंतर निवडसूची जाहीर केली जाणार आहे.