बंडाच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाकडून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ‘हकालपट्टी’!


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ‘हकालपट्टी’ करत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ या पक्षचिन्हावरच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरही दावा ठोकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अजित पवार गटाने बंडाच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाला ईमेल पाठवून ही खेळी खेळल्याचे उघड झाले आहे.

 अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज आणि शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांना सोबत घेऊन रविवारी (२ जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्याच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक ईमेल पाठवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असे या ईमेलद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवत पक्षाचे नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा ठोकला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेल पाठवून अजित पवार गटाने हा दावा केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक केव्हा झाली आणि हा निर्णय कधी झाला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला कोणकोण नेते उपस्थित होते, हेही स्पष्ट झालेले नाही.

अजित पवार गटाचा हा ईमेल केंद्रीय निवडणूक आयोगाला ३० जून रोजीच पाठवण्यात आला. या ईमेलबरोबरच ४० आमदार आणि खासदारांची शपथपत्रेही सादर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्य आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केल्याचेही या ईमेलमध्ये नमूद केले आहे. प्रफुल्ल पटेल यांचे कार्याध्यक्षपद मात्र कायम ठेवण्यात आले आहे, असे या ईमेलमध्ये म्हटले आहे.

अजित पवार गटाच्या या खेळीनंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अजित पवार गटाच्या अर्जावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी जयंत पाटील यांनी या पत्रात केली आहे. बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचेही जयंत पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे.

नंबरगेममध्ये पुतण्या काकापेक्षा वरचढ, पण…

दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटाच्या बैठका आज मुंबईत झाल्या. अजित पवार गटाची बैठक छगन भुजबळांच्या मालकीच्या एमईटीमध्ये झाली. या बैठकीत काका शरद पवारांपेक्षा जास्त आमदार जमवण्यात पुतण्या अजित पवार यशस्वी झाले खरे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आपल्या बाजूने जमवण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे हे बंड कायदेशीरदृष्ट्या फसण्याची जास्त शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादीवर दावा सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकूण आमदारांपैकी ३६ आमदार त्यांच्या बाजूने असणे आवश्यक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी २९ आमदार अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थित होते. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यासाठी त्यांना अद्यापही ७ आमदारांची आवश्यकता आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला १७ आमदार उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *