मुंबईः विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा सुरू असतानाच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, यासाठी अजित पवार गट आग्रही असून अजित पवार गट एकनाथ शिंदेंचा गेम करू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बैठक झाली. या बैठकीत अजित पवार आणि त्यांच्या सर्व ४१ आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी आग्रही मागणी केली. अजित पवारांचा गट एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी स्वतः अजित पवारांचीच इच्छा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे २८८ पैकी तब्बल २३४ जागा मिळाल्या. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपला १३२, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, यासाठी एकनाथ शिंदे गट आग्रही असला तरी भाजपसोबत अजित पवार गट आल्यामुळे शिंदे गटाला एक पाऊल मागे घेण्याची वेळ आली आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद नाकारले आणि त्यांनी महायुतीचा पाठिंबा काढून घेतला तरी देवेंद्र फडणवीस हे अजित पवार गटाच्या पाठिंब्यावर सहजपणे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि पाच वर्षे स्थिर सरकार चालवू शकतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीसांचे पारड जास्त जड असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिंदे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि उपाययोजनांमुळेच महायुतीला एवढे प्रचंड बहुमत मिळाले, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे, अशी शिंदे गटाच्या आमदारांची इच्छा आहे. शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाला. शिंदे यांच्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा महायुतीला फटका बसला नाही, असे तर्क शिंदे गटाकडून दिले जाऊ लागले आहेत.
परंतु अजित पवार गट त्यासाठी अनुकूल नाही. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या मागे ताकद लावून मंत्रिमंडळातील महत्वाची मंत्रिपदे पदरात पाडून घेण्याची अजित पवार गटाची योजना असल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्याच नावाचा आग्रह धरण्यामागे अजित पवार गटाला भाजप नेतृत्वाच्या गुडबुकमध्ये जाऊन महत्वाची खाती पदरात पाडून घ्यायची आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अजित पवार गटाकडून एकनाथ शिंदे यांचा गेम केला जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.