अजितदादांची नवीन खेळीः जयंत पाटलांची हकालपट्टी, सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष; शरद पवारांकडूनही कारवाईचा बडगा


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज नवीन खेळी केली. जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून  त्यांच्या जागी सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तर प्रतोदपदी अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती केली. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली. दुसरीकडे शरद पवारांनी सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांनी पक्षातून बडतर्फ केले आहे.

 अजित पवार आणि त्यांना साथ दिलेल्या आमदारांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवल्यानंतर अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार घेत माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला स्वतः अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हजर होते.

 कुठल्याही नेत्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही किंवा कुठल्याही नियुक्त्या तुम्ही करू शकत नाही. आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, असा इशाराच अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेतून शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिला.

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले आहे. सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज आजच हँण्डओव्हर करावा, असे जयंत पाटलांना सांगण्यात आले आहे. अजित पवार यांची गटनेतेपदी तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

 बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत म्हणूनच मी उपमुख्यमंत्री झालो आहे. माझ्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव आमच्यासोबतच आहे. त्यावर वाद न घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु आमच्या आमदारांना कुणी घाबरवू नये. रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले.

सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल बडतर्फ

दुसरीकडे शरद पवार यांच्या गटानेही अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध कारवाईचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या पत्राची दखल घेत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ केले आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा देऊन आणि शपथविधीला उपस्थित राहून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांत्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. तत्पूर्वी अजित पवार यांना साथ दिलेल्या नऊ आमदारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षशिस्तीचा भंग केल्याची कारवाई केली आहे. पक्षाच्या घटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीने हे पत्र जारी करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!