पुणे: भरबैठकीत जोरजोराने ओऱडत मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्देशून जातीवाचक शब्दांचा वापर करणाऱ्या पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी तसे आदेश काढले आहेत. मात्र या आदेशात जातीवाचक शब्द वापरून मागासवर्गीयांना अपमानित केल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा आणि शिस्तभंग केल्यामुळे विभागीय चौकशी होणार की नाही, याचा कोणताही उल्लेख या आदेशात नाही.
पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा ज्योत्सना पडियार- हिरमुखे यांनी १५ जुलै रोजी त्यांच्या दालनात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला समितीचे संशोधन अधिकारी व उपायुक्त डॉ. दीपक खरात यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठक सुरू झाल्यानंतर ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाबाबत सूचना देत असताना धेडगुजरीपणाचे कामकाज मला चालणार नाही, असे जोरजोरात ओरडून सूचना द्यायला सुरूवात केली. त्यांच्या बोलण्यात वारंवार ‘धेडगुजरीपणा’ या जातीवाचक शब्दाचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे बैठकीला हजर असलेले मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी अपमानित झाले.
अपमानित झालेल्या १३ अधिकारी कर्मचाऱ्यांनी समाज कल्याण उपायुक्त व जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य डॉ. दीपक खरात यांच्याकडे त्याच दिवशी लेखी तक्रार केली आणि डॉ. ज्योत्सना पडियार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. डॉ. खरात यांनी ही तक्रार लगेचच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्याकडे वर्ग केली खरी परंतु वारे यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
बार्टीच्या महासंचालकांकडून डॉ. पडियार यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला होता. राज्यभरातील आंबेडकरी संघटनांच्या नेत्यांनीही पडियार यांच्याविरूद्ध कारवाईची मागणी लावून धरली होती. मात्र १९ जुलै रोजी न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सूत्रे हलली आणि डॉ. ज्योत्सना पडियार यांच्याकडील पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला. आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ऍट्रॉसिटी, विभागीय चौकशी होणार की नाही?
डॉ. ज्योत्सना पडियार यांनी मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना हिनतेची वागणूक देण्याच्या हेतूनेच ‘धेडगुजरीपणा’ या जातीवाचक शब्दाचा वारंवार वापर केला. त्यामुळे डॉ. पडियार यांच्याविरूद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्यांची विभागीय चौकशी करा, अशी मागणी राज्यातील अनेक आंबेडकरी संघटनांनी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्याकडे केली होती. पण वारे यांनी पडियार यांचा केवळ पदभार काढून घेतला. त्यामुळे पडियार यांच्याविरूद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार की नाही? आणि त्यांची विभागीय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई होणार की नाही?, असा सवाल या आंबेडकरी संघटना करत आहेत.