महाराष्ट्रात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता, सर्वाधिक वेठबिगार कातकरी समाजातील!


मुंबई:  राज्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी समाजातील होते.

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे.

शासन अधिसूचना दि.१७/०६/२००२ व दि.०५/०८/२००८ अन्वये वेठबिगार अधिनियम १९७६ च्या अंमलबजावणीकरिता राज्यामध्ये ३२ जिल्हा  दक्षता समित्या स्थापन केल्या असून उप विभागीय स्तरावर एकूण १२४ उप विभागीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. 

या दक्षता समित्यांचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून उप विभागीय दक्षता समित्यांचे विभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत. सदर दक्षता समित्यांची व उप विभागीय समित्यांची वेळोवेळी बैठका होत आहेत. कातकरी निर्मुलनासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची अंमलबजावणी या समित्यांच्या माध्यमातुन करण्यात येते.

राज्यात मागील दोन वर्षात १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्हयामध्ये जानेवारी, २०२१ ते डिसेंबर, २०२३ या कालावधीत कातकरी समाजातील एकूण ६७ बेठबिगार आढळून आलेले आहेत.  पालघर जिल्हयाचे रहिवासी असलेले एकूण २३ वेठबिगार कामगार हे सन २०१९ मध्ये १३ व सन २०२० मध्ये ५ असे एकूण १८ वेठबिगार ठाणे जिल्ह्यात आढळुन आलेले आहेत.

  सन २०२२ मध्ये ५ कामगार अहमदनगर जिल्ह्यात काम करताना आढळून आलेले असून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये कातकरी समाजातील एकूण ३७ वेठबिगार कामगार (नाशिक जिल्हयातील १ व अहमदनगर जिल्हयातील ३६) आढळून आलेले आहेत तर  रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी, २०२१ ते डिसेंबर, २०२३ या कालावधित कातकरी समाजातील एकही बेठबिगार आढळून आलेला नसल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे.

कामगार विभागाच्या पाठपुराव्याने  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २३ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार एकूण ५ कामगारांना प्रत्येकी २५,००० रूपये प्रमाणे १ लाख २५,००० रुपये इतकी आर्थिक मदत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आलेली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळलेल्या कातकरी समाजातील एकूण ३७ वेठबिगार कामगारपैकी  (नाशिक जिल्हयातील १ व अहमदनगर जिल्हयातील ३६ ) २५ वेठबिगारांना प्रत्येकी  ३०,००० रुपये प्रमाणे एकूण ७ लाख ५०,००० रुपये एवढी तातडीची आर्थिक मदत करण्यात आलेली तसेच पीएफएमएस प्रणालीमार्फत नाशिक जिल्हयातील १ कामगारास पहिला हप्ता २५,००० रुपये व दुसरा हप्ता ५०,००० रुपये  देण्यात आलेला आहे.

भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयने वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनाकरिता Central Sector Scheme for Rehabilitation of Bonded Labour-2016  या योजनेत सुधारणा करुन वेठबिगार पुनर्वसन योजना, २०२१ ही सुधारित योजना सन २०२१  ते सन २०२५ २०२६ या कालावधीकरिता दिनांक जानेवारी २०२२ पासून लागू केलेली आहे.

 सदर याजनेमध्ये प्रौढ पुरूष लाभार्थीस १ लाख रुपये, विशेष प्रवर्गातील लाभार्थीस २ लाख रुपये, तीव्र स्वरुपाच्या वेठबिगारीशी संबंधित दुर्लक्षित प्रकरणांमध्ये प्रत्येकी ३ लाख रुपये इतके पुनर्वसनाकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते.

सदर योजनेमध्ये वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनाकरिता जिल्हा स्तरावर निधी उभारुन त्यामध्ये कमीत कमी  १० लाख रुपये इतका कॉर्पस फंड ठेवण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, ठाणे व  पालघर यांच्यामार्फत शासनास वेळोवेळी कॉर्पस फंडाची मागणी करण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!