छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): इतरांच्या साहित्याची जशास तशी ढापाढापी करून पीएच.डी.चा शोधप्रबंध सादर करणे महाभाग ‘विद्यावाचस्पती’ना चांगलेच महागात पडणार आहे. न्यूजटाऊनने उघडकीस आणलेल्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधातील वाङ्मयचोरीची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असून त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. या चौकशीत संशोधन मार्गदर्शकांनाही रडारवर घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या पीएच.डी. च्या शोधप्रबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाङ्मयचौर्य होत असल्याच्या असंख्य तक्रारी येऊ लागल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये या वाङ्मयचौर्याला पायबंद घालण्यासाठी ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम’ लागू केला. या नियमात पीएच.डी.चे प्रबंध आणि रिसर्च पेपर्समधील वाङ्मयचौर्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. तरीही पीएच.डी. च्या शोधप्रबंधातील वाङ्मयचोरीला म्हणावा तसा आळा बसलेला नाही.
यूजीसीचा हा नियम अंमलात येण्याआधी तर ‘या पीएच.डी.च्या शोधप्रबंधात ‘आपण केलेले हे संशोधन मूळ संशोधन कार्य’ शपथपत्र सादर करून अनेकांनी सर्रास ढापाढापी केलेले शोधप्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी मिळवली आणि त्या पदवीच्या आधारे लाभही पदरात पाडून घेतले. उच्च शिक्षण संस्थांतील वाढत्या वाङ्मयचोरीच्या पार्श्वभूमीवर ‘न्यूजटाऊन’ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर करण्यात आलेल्या पीएच.डी.च्या काही शोधप्रबंधांची वाङ्मयचोरीचा छडा लावणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने झाडाझडती घेतली असता धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत.
पीएच.डी.च्या शोधप्रबंधातील उचलेगिरीचा ‘न्यूजटाऊन’ने पर्दाफाश केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. पीएच.डी. च्या शोधप्रबंधातील वाङ्मयचोरीचे प्रमाण पाहून अनेकांना धक्काच बसला आणि पीएच.डी.साठी केल्या जाणाऱ्या संशोधनाची दर्जा आणि गुणवत्तेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
आता या ढापाढापीची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वीच प्र-कुलगुरूंच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीला चारही विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या बैठकीत ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम २०१८’ वर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संशोधन छात्राइतकेच मार्गदर्शकही जबाबदार
कोणताही संशोधक छात्र उच्च विद्याविभूषित संशोधन मार्गदर्शकाच्या देखरेख आणि मार्गदर्शनाखाली पीएच.डी.साठी संशोधन करतो. संशोधन छात्राने केलेल्या संशोधनाची प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शकाकडून झाडाझडती अपेक्षित आहे. तरीही हे प्रकार घडल्यामुळे या सर्वच प्रकरणात संशोधन छात्र आणि मार्गदर्शकांची मिलीभगत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे पीएच.डी.च्या शोधप्रबंधातील वाङ्मयचोरीला जेवढे संशोधन छात्र जबाबदार आहेत, तितकेच त्याचे मार्गदर्शकही जबाबदार आहेत. त्यामुळे आता संशोधन मार्गदर्शकांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.