छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मझहर अहेमद फारूकी यांच्या प्राचार्यपदावरील फेरनियुक्तीच्या वेळी कुलगुरू प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आलेले कडा येथील आनंदरावजी धोंडे उर्फ बाबाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर न करता बनवाबनवी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला खोटा अहवाल सादर केल्याचे पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.
प्राचार्य डॉ. मझहर फारूकी यांची प्राचार्यपदाची पहिली टर्म संपायला अवघे सहा दिवसच शिल्लक राहिले असताना नियम धाब्यावर बसवून त्यांची दुसऱ्या टर्मसाठी प्राचार्यपदी फेरनियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीने शासन निर्णय धाब्यावर बसवून डॉ. फारूकी यांच्या फेरनियुक्तीचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे २६ ऑगस्ट २०२१ रोजी सादर केला. हा प्रस्ताव हाती पडताक्षणीच विद्यापीठ प्रशासनाने त्याच दिवशी डॉ. फारूकी यांना प्राचार्यपदी फेरनियुक्ती करण्यासाठी कुलगुरूंचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आल्याचे पत्र संस्थेला दिले.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदरावजी धोंडे उर्फ बाबाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांची एक्सटर्नल पीएर रिव्ह्यू समितीवर कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाने विहित केलेल्या नियमांनुसार डॉ. मझहर फारूकी हे प्राचार्यपादवर पुनर्नियुक्तीस पात्र आहेत किंवा कसे याबाबतचे मूल्यांकन करून स्वयंस्पष्ट अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर करण्याची जबाबदारी डॉ. विधाते यांचीच होती. परंतु ही जबाबदारी पार पाडताना डॉ. विधाते यांनी बनवाबनवी करत वस्तुस्थितीदर्शक अहवालच सादर केला नाही. शासन निर्णयाचे उल्लंघन करून ही प्रक्रिया राबवली जात असताना देखील त्यांनी त्याकडे हेतुतः कानाडोळा केला आणि डॉ. मझहर फारूकी हे प्राचार्यपदी फेरनियुक्तीस पात्र असल्याची शिफारस करणारा अहवाल शैक्षणिक विभागाच्या उपकुलसचिवांकडे सादर केला.
विद्यापीठाने डॉ. विधाते यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना आणि महाराष्ट्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील तरतुदींच्या कसोट्यांवर डॉ. मझहर फारूकी हे प्राचार्यपदी फेरनियुक्तीस पात्र आहेत किंवा नाही, याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याची जबाबदारी कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून डॉ. विधाते यांच्यावरच होती.
महाराष्ट्र शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजीचा शासन निर्णय अकृषि विद्यापीठे, संलग्न महाविद्यालयात विद्यापीठातील शिक्षक व अन्य शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किमान योग्यता आणि उच्च शैक्षणिक मानके राखण्यासाठीच्या उपायांशी संबंधित आहे. या शासन निर्णयातील नियम VI (a) मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरील फेरनियुक्तीची प्रक्रिया विशद करण्यात आली आहे. त्यानुसार ‘The term of appointment of the Principal, shall be five years with eligibility for reappointment for one more term. If the Management intends to reappoint the existing Principal, the Management shall initiate the process of external peer review at least six months before.’ म्हणजेच एखाद्या व्यवस्थापनाचा विद्यमान प्राचार्याची पुनर्नियुक्ती करण्याचा इरादा असेल तर व्यवस्थापनाने एक्सटर्नल पीअर रिव्ह्यूची प्रक्रिया किमान सहा महिने आधी सुरू करणे आवश्यक आहे.
प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी डॉ. मझहर फारूकी यांच्या फेरनियुक्तीबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे सादर करताना शासन निर्णयातील याच तरतुदीकडे हेतुतः दुर्लक्ष केले. त्यांनी सादर केलेल्या अहवालात ‘विद्यापीठ अनुदान आयोगाची १८ जुलै २०१८ चीअधिसूचना, ८ मार्च २०१९ चा शासन निर्णय व महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय १२ जुलै २०१६ अन्वये व उक्त प्रकरणी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार प्राचार्य डॉ. मझहर अहेमद फारूकी हे पुनर्नियुक्तीस पात्र आहेत, अशी आम्ही स्पष्ट शिफारस करत आहोत,’ असे नमूद करण्यात आले आहे.
डॉ. विधातेंनी द्यावीत ‘या’ प्रश्नांची उत्तरे!
डॉ. विधाते यांनी आपल्या अहवालात ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार ही फेरनियुक्तीची प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही, असे का नमूद केले नाही? डॉ. मझहर फारूकी यांनी फेरनियुक्तीच्या वेळी जन्मतारखेनुसार वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेली असतानाही १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार त्यांची शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत फिटनेस चाचणी घेणे अनिवार्य आहे, अशी शिफारस आपल्या अहवालात का केली नाही? त्यांनी वस्तुस्थितीकडे हेतुतः दुर्लक्ष का केले? या प्रश्नांची उत्तरे विद्यापीठ प्रशासनाने डॉ. विधातेंकडूनच घेण्याची वेळ आली आहे.
कोण आहेत प्राचार्य डॉ. विधाते?
डॉ. हरिदास विधाते हे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेतच. शिवाय ते आष्टी तालुक्यातील बहुचर्चित बेलगाव येथील खंडोबा देवस्थानच्या ५५ एकर जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात त्यांना २१ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली होती. २६ सप्टेंबरपर्यंत ते पोलिस कोठडीत तर त्यानंतर ४ ऑक्टोबरपर्यंत २०२३ पर्यंत ते न्यायालयीन कोठडीत तुरुंगात होते.