छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): दलित चळवळीचा ढाण्या वाघ, नामांतर आंदोलनाचे प्रणेने, माजी परिवहन राज्यमंत्री आणि पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे आज शनिवारी पहाटे ४ वाजता दीर्घाजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील धगधगता ज्वालामुखी शांत झाला आहे.
गंगाधर गाडे आणि दलित चळवळ असे एक समीकरणच होऊन बसले होते. गंगाधर गाडे हे आक्रमक पँथर नेते होते. दलित पँथरचे सरचिटणीस असताना त्यांनी ७ जुलै १९७७ रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव मांडला आणि तब्बल १७ वर्षे नामांतर आंदोलनाची धग त्यांनी कायम ठेवली.
कोणतेही काम पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे करण्याची शैली आणि आक्रमक स्वभाव भल्याभल्यांना घाम फोडत असे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या निमित्ताने गाडे यांनी आक्रमक कार्यकर्त्यांची फौजच मराठवाड्यात उभी केली होती.
गाडे यांनी पुढाकार घेऊन छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) तब्बल ४७ दलित वसाहती वसवल्या आणि त्या वसाहतींना संरक्षण दिले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय उस्मानपुऱ्यातील शैक्षणिक संकुलात केली. शिक्षण संस्था आणि सामाजिक उपक्रमांतून गाडे यांनी वंचित समाजासाठी भरीव काम केले. पँथर पॉवर कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे संघटनही उभारले होते.
१९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात त्यांनी परिवहन राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये झाला होता. पाच वर्षांपासून त्यांना अल्झायमरने ग्रासले होते. नियमित तपासणी आणि उपचारासाठी त्यांना शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच आज शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यदर्शनासाठी पार्थिव विद्यापीठ गेट, व आनंदवनात
गंगाधर गाडे यांचे पार्थिव उद्या रविवारी सकाळी ८ ते १० वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ४ यावेळेत उस्मानपुरा, पीर बाजार येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता आनंदवन या गाडे यांनीच स्थापन केलेल्या शैक्षणिक संकुलाच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.