डॉ. जयश्री सूर्यवंशींना भरावे लागणार बनावट जातप्रमाणपत्रावर नऊ वर्षे लाटलेले वेतन, इं.भा.पा. महाविद्यालयाने बजावली नोटीस


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  राजपूत भामटा जातीचे बनावट जातप्रमाणपत्र हस्तगत करून त्याआधारे डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात अधिव्याख्यात्याची नोकरी मिळवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कुलसचिव आणि याच विद्यापीठातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना बनावट जातप्रमाणपत्राआधारे आधारे १९९९ ते २००८ अशी नऊ वर्षे शासनाच्या तिजोरीतून लाटलेल्या वेतनाची रक्कम भरावी लागणार आहे. महाविद्यालयाने त्यांना वसुलीची नोटीस बजावली असून १५ दिवसांच्या आत नोटिशीला उत्तर न दिल्यास वसुलीची कार्यवाही सुरू केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

 डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट जातप्रमाणपत्र हस्तगत केले आणि याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी १९९३ मध्ये डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात अधिव्याख्यात्याची नोकरी मिळवली होती. त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्रावर अनेकांनी आक्षेप नोंदवले. त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि अखेर त्यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सध्या त्या विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात प्राध्यापकपदावर कार्यरत आहेत. आता त्यांना १९९९ ते २००८ या काळात शासनाच्या तिजोरीतून लाटलेल्या वेतनाच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे.

डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी १८ मार्च २०२४ रोजी डॉ. सूर्यवंशी यांना नोटीस बजावली आहे. डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात व्हीजेएनटीसाठी राखीव असलेल्या विनाअनुदानित वाणिज्य विषयाच्या अधिव्याख्यातापदी डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या अर्जात व्हीजेएनटी प्रवर्गातील असल्याचे नमूद केले होते आणि  त्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ १५ नोव्हेंबर १९९० रोजी तहसीलदार कन्नड यांच्याकडून मिळवलेले जातप्रमाणपत्र जोडले होते.

दरम्यानच्या काळात महाविद्यालयाने राज्य सरकारकडे वाणिज्य शाखेला १०० टक्के अनुदान मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात डॉ. सूर्यवंशी यांचे नाव व्हीजेएनटी प्रवर्गातील वाणिज्य विषयाच्या अधिव्याख्याता म्हणून दाखवण्यात आले होते. जुलै १९९७ मध्ये राज्य सरकारने १९९९-२००० या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विषयाला शंभर टक्के अनुदान मंजूर केले. त्यानुसार डॉ. सूर्यवंशी यांना शासकीय अनुदानातून वेतन अदा करण्यात आले.

महाविद्यालयाच्या रेकॉर्डनुसार डॉ. सूर्यवंशी यांना १९९९ ते २००८ या काळात शासकीय अनुदानातून वेतन देण्यात आले. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास वारंवार सांगूनही डॉ. सूर्यवंशी यांनी ते २००८ पर्यंत सादर केले नाही, असे या नोटिशीत म्हटले आहे.

डॉ. इं.भा.पाठक महिला महाविद्यालयात नियुक्तीच्या वेळी डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या जातप्रमाणपत्राला सुभाष बोरीकर यांनी औरंगाबादच्या जातपडताळणी समितीसमोर आव्हान दिले होते. १५ मे २०२२ रोजी जातपडताळणी समितीने डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवले होते.

जातपडताळणी समितीच्या निर्णयानुसार डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे शासकीय तिजोरीतून लाटलेल्या वेतनाची वसुली करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सुभाष बोरीकर यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालकांना (उच्च शिक्षण) दिले होते. त्यानुसार विभागीय सहसंचालकांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याकडून त्यांनी लाटलेल्या वेतनाची वसुली करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महाविद्यालयाने ही नोटीस बजावली आहे.

१९९९ ते २००८ या काळात शासकीय अनुदानातून तुम्ही उचललेले वेतन वसूल करण्यासाठी यथायोग्य कार्यवाही का सुरू करण्यात येऊ नये?, याबाबत नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यात यावा, अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही असे गृहित धरून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!