नवी दिल्लीः यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यापेक्षा जास्त होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक असल्यामुळे १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात हंगामी पाऊस सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोसमी पावसाबद्दलचा दुसरा सुधारित अंदाज व्यक्त केला जाणार आहे. या सुधारित अंदाजात महिनानिहाय पावसाचा अंदाज जाहीर केला जाईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती सक्रीय आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि मान्सूनच्या दुसऱ्या मध्यात म्हणजेच ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात ला-निना सक्रीय होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
आजवर ला-निनाच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. अपवाद वगळता ला-निना काळात नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होऊन निर्धारित वेळेत देशभर पोहोचतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
इंडियन ओशन डायपोल म्हणजेच हिंद महासागरातील द्विध्रुवीता सध्या निष्क्रीय आहे. जूनच्या सुरूवातीस ही द्विध्रुविता सक्रीय होईल. युरोप आणि आशियातील म्हणजेच युरोशियातील बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. ही सर्व स्थिती नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक असून त्यामुळे देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजात मध्य भारत, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात चांगला पाऊस होण्याचा अंदाज असला तरी देशाच्या काही भागात म्हणजेच जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.