हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार? खासदार आणि समर्थक धास्तावले, २०० गाड्या भरून शिवसैनिकांची मुंबईकडे धाव!


मुंबईः हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी त्यांच्या उमेदवारीला मतदारसंघातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे. हिंगोलीतील उमेदवार बदला किंवा ही जागा भाजपकडे घ्या, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर अनिश्चिततेचे सावट घोंगावू लागले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या हेमंत पाटील समर्थकांनी २०० गाड्या भरून मुंबईच्या दिशेने धाव घेतली असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

हिंगोलीतून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच हा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी भाजप पदाधिकारी आग्रही होते. परंतु महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यात गेली आणि अपेक्षेप्रमाणे हेमंत पाटलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली.

हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला. हेमंत पाटील हे कार्यकर्त्यांना उपलब्ध होत नाहीत, ते फोनही उचलत नाहीत, अशी कारणे देत एक तर हिंगोलीचा उमेदवार बदला किंवा ही जागा भाजपकडे घ्या, अशी आग्रही मागणी भाजप पदाधिकारी करत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हेमंत पाटलांऐवजी धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणालाही उमेदवारी द्या किंवा ही जागा भाजपकडे घ्या, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने परभणी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली मागणी पुढे रेटली होती.

महायुतीत भाजप हाच एकमेव शक्तीशाली असल्यामुळे हिंगोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार हेमंत पाटील हे चांगलेच हैराण झाले आहेत. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी नांदेडमध्ये बैठक घेण्यात आली.

कुठल्याही परिस्थितीत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलू नये, असा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. शिवसेनेच्या उमेदवारीच्या विषयात भाजपने हस्तक्षेप केल्यास नांदेड लोकसभा मतदारसंघात आम्ही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

एकीकडे भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरू असतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना शिंदे गटानेही दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोलीतील उमेदवार बदलू नये आणि हेमंत पाटील यांचीच उमेदवारी कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी घेऊन नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते २०० गाड्या घेऊन मुंबईत पोहोचले आहेत. ते मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली मागणी रेटणार आहेत.

कोणाचे ‘कल्याण’ होणार? संदिग्धता कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. कल्याण मतदारसंघावरही भाजपने दावा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना श्रीकांत शिंदेंचीच उमेदवारी अद्यापही जाहीर करता आलेली नाही. त्यामुळे हिंगोलीतील उमेदवार बदलायचा की हेमंत पाटलांचीच उमेदवारी कायम ठेवायची? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतंत्रपणे कितपत निर्णय घेऊ शकतील, याबाबतच संदिग्धता आहे. त्यामुळे हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत टांगती तलवारच राहणार असून प्रचार करावा की नाही? अशा द्विधा मनःस्थितीत हेमंत पाटील समर्थक असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *