मुंबई: महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितने दोन उमेदवार याद्या जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मानले जात असतानाच काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी काँग्रेसचे बडे नेते सरसावले असून अकोल्यातील उमेदवार मागे घेऊन प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा, असा सांगावा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे धाडण्यात आला आहे. या घडामोडींमुळे काँग्रेस-वंचितचे सूत जुळण्याची आणि महाराष्ट्रातील लोकसभेची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत समावेश करून घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु या प्रयत्नांना मुर्तरुप येऊ शकले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
ही यादी जाहीर करण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यावर टिकास्त्र सोडतानाच काँग्रेसबाबत सौम्य धोरण स्वीकारले आणि काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा जाहीर केला.
पहिली यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकरांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आणि कोल्हापुरातील उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला.
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. वंचितने काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दलंशवली,त्यापैकी दोन उमेदवारांना पाठिंबाही जाहीर करून टाकला. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उर्वरित पाच उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीला देणार आहेत. त्यामुळे वंचितच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्या सात उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडी घडत असतानाच प्रकाश आंबेडकरांसाठी बडे काँग्रेस नेते सरसावले आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठीचा आग्रह धरला जाऊ लागला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून अकोल्यातील उमेदवार मागे घेतला जाऊ शकतो, असे संकेत काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
प्रकाश आंबेडकर जर आपणाला सात जागांवर पाठिंबा देत असतील तर आपण अकोल्यातील उमेदवारीबद्दल पुनर्विचार करावा, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. याची माहिती आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेसकडून अकोल्यासाठी डॉ. अभय पाटील यांचे नाव कालच झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. परंतु काँग्रेस वर्तुळात घडत असलेल्या ताज्या घडामोडी पाहता काँग्रेस अकोल्यातील उमेदवारी मागे घेऊन प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊ शकते, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा जाहीर करूनही काँग्रेसने जर त्यांना अकोल्यात पाठिंबा जाहीर केला नाही तर राज्यभरातील मतदारांत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असा तर्कही त्यामागे दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-वंचितची दिलजमाई जवळपास निश्चित मानली जात असून त्यामुळे अकोल्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.