सीएसआर फंडातही भाजपने हात मारला, हा आकडा १,१४,४७० कोटींच्या घरातः शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप

मुंबईः  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला १ हजार ८२३ कोटी रुपयांची रिकव्हरी नोटीस बजावण्यात आल्यामुळे राष्ट्रीयस्तरावर मोदी सरकारसह भाजपवर टिकास्त्र सोडले जात आहे. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई म्हणजे अर्थ-भामट्यांचा दहशतवाद असल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपने सीएसआर फंडातही हात मारला आहे व हा आकडा १, १४,४७० कोटी इतका आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे गटाने केला आहे.

भाजपने देशात सर्वच स्तरांवर आर्थिक अफरातफर केली आहे. त्याच अफरातफरीच्या पैशांवर त्यांचे राजकारण सुरू आहे. सीएसआर फंडातही भाजपने हात मारला आहे व हा आकडा १,१४,४७० कोटी इतका आहे. मनमोहन सरकारने २०१३ मध् एक कायदा केला. प्रत्येक कंपनीला २ टक्के लाभाचा पैसा सीएसआर म्हणजेच जनकल्याणाच्या कार्यात द्यावा लागेल. हा पैसा लोकांसाठी वापरायचा होता, पण भाजपने हा पैसा त्यांच्या खासगी संस्था, स्वतःची प्रसिद्धी व इतर बनावट कार्यात वापरला. त्यांच्या मर्जीतल्या विश्वस्त संस्था, एनजीओच्या खात्यात हा पैसा वळवून दुसऱ्या मार्गाने त्याच कंपन्यांच्या मालकांना लाभ मिळवून दिले. यातील पैसा परदेशातही गेला. आंगडियांचा वार करन ‘मनी लाँडरिंग’ करण्यात आले. पण येथे ना ईडी घुसली ना तुमचे इन्कम टॅक्सवाले, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

मोदी व भाजप ‘चारशे पार’ करण्याची गर्जना करीत असले तरी प्रत्यक्षात हे लोक घाबरले आहेत आणि सत्ता हातून निसटत असल्याच्या भीतीने या असल्या कारवाया करत आहेत. अनेक करबुडव्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. निवडणूक रोखे घोटाळ्यात किमान १७ कंपन्या अशा आहेत की, भाजपने त्यांना कोट्यवधींची करमाफी देऊन त्या बदल्यात निवडणूक रोखे घेतले. या गुन्ह्यांची माहिती इन्कम टॅक्सकडे नाही, असे सांगणे मूर्खपणाचे आहेत, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

नोटाबंदींच्या काळात रिझर्व्ह बँकेतून ५०० च्या ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा गायहब झाल्या. नव्याने छापलेल्या त्या नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. मधल्या मध्ये हे पैसे गायब झाले. या पैशांना कोठे पाय फुटले? जर हे सर्व खरे असेल तर त्याबाबत काय कारवाई झाली? है पैसे कुणाच्या खात्यात गेले की घशात गेले? याच पैशांवर उद्याच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. यावर काहीच खुलासा झालेला नाही. भारतीय जनता पक्षाचे हे पाप आहे. देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण भाजपच्या डॉक्टरांना चिंता नाही, असा टोला आता पी. चिदंबरम यांनी मारला आहे. अर्थव्यवस्था समजू शकेल अशी व्यक्ती भाजपमध्ये नाही. वारेमाप उधळपट्टी व ईडीच्या मार्गाने एवढेच त्यांचे अर्थज्ञान आहे, असा आरोपही शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.

भाजपच्या खात्यात गैरमार्गाने ८ हजार कोटी

भाजपमध्ये डॉक्टर नसून मनोरूग्ण आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था पंगू बनली. अर्थव्यवस्थेवर संघाचा प्रभाव आहे. म्हणजे भाजपने सुरू केलेल्या लुटमारीस संघाची मान्यता आहे. त्यांचे अर्थशास्त्र हे रामदेव बाबा पॅटर्नचे आहे. आजही ते शेण, गोमुत्र अशा अर्थतंत्रात अडकून देश चालवीत आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक नीती व गती खड्ड्यात गेली आहे. देशाच्या परकीय थेट गुंतवणुकीत ३१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पण त्यांच्या अर्थ खात्यातील घोटाळे व दहशतवादामुळे भाजपच्या खात्यात ८ हजार कोटींचा माल गैरमार्गाने पोहोचला त्याचे काय?, असा सवाल या अग्रलेखात करण्यात आला आहे.

सीतारामन बाईंकडून स्वच्छतेचा आव

या घोटाळ्यास अर्थमंत्री सीतारामनही तितक्याच जबाबदार आहेत. इन्कम टॅक्स खाते सीतारामन सांभाळतात. त्या खात्याने काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, तृणमूलला करवसुलीच्या नोटिसा पाठवल्या, पण वाममार्गाने ८ हजार कोटी मिळवणाऱ्या भाजप कार्यालयाचा पत्ता सीतारामन बाईंना माहीत नाही. मोदीप्रमाणेच सीतारामनही खोटो बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थ खाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पहात आहेत. भाजपमध्ये ‘नमो’ रुग्ण होतेच, आता त्यांची अवस्था मनोरूग्णांप्रमाणे झालेली असते. लोकसभा निवडणूक धड होऊ द्यायची नाही. विरोधकांची आर्थिक नाकेबंदी करून त्यांचे हातपाय बांधून मैदानात ढकलायचे व स्वतः मात्र पैशांच्या राशीवर बसून चौफेर उधळायचे हे त्यांचे विकृत धोरण आहे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!