शेकापच्या झुंजार आणि अभ्यासू ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन, आक्रमक कोकणकन्या काळाच्या पडद्याआड


अलिबागः शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकापच्या आक्रमक आणि अभ्यासू ज्येष्ठ नेत्या, माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजता पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीनवेळा आमदार होत्या. विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांनी राज्य मंत्री म्हणूनही काम केले होते.

एक अभ्यासू आणि आक्रमक नेत्या अशी मीनाक्षी पाटलांची ओळख होती. शेकापच्या वतीने आरसीएफ, रेवस मांडवा विमानतळ, महासेझ, आयपीएल आदी प्रकल्पांच्या विरोधात आंदोलने करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

मीनाक्षी पाटील १९९२ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग-उरण मतदारसंघातून त्या पहिल्या महिला आमदार म्हणून विजयी झाल्या. विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर सुरूवातीपासूनच त्यांनी आपला आक्रमक बाणा दाखवून दिला होता. १९९५ मध्ये महाराष्ट्रात प्रथमच भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले होते. त्यावेळी मीनाक्षी पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून मतदारसंघाचे अनेक प्रश्न तडीस नेले होते. विरोधी पक्षात राहूनही सत्ताधारी पक्षासोबत चांगले संबंध ठेवून त्यांनी मतदारसंघात विकास निधी आणला होता.

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या पुन्हा अलिबागमधून विजयी झाल्या. या निवडणुकीनंतर त्यानंतर स्थापन झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारमध्ये शेकाप सहभागी झाला होता. विलासराव देशमुख सरकारमध्ये शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, मोहन पाटील आणि मीनाक्षी पाटील यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी कोकणातील बंदरे विकासासाठी विशेष प्रयत्न केले होते.

२००४ मध्ये मीनाक्षी पाटील तिसऱ्यांदा अलिबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. परंतु काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा उभारी घेत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. २००९ ते २०१४ च्या काळात आमदार म्हणून त्यांनी प्रभावीपणे कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *