नांदेड शहराला भूकंपाचे धक्के, जमिनीतील गूढ आवाजामुळे भयभीत होऊन नागरिक रस्त्यावर!


नांदेडः रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरात भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीतून गूढ आवाज येत भूकंपाचे हे धक्के जाणवल्यामुळे भयभीय होऊन घरातील नागरिक रस्त्यावर आले. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता सौम्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु अचानक भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागिरकांची एकच धावपळ झाली.

नांदेड शहरातील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर, शिवाजीनगर, पोलिस कॉलनी, व्हीआयपी रोड, रामराव पवार मार्ग, पावडेवाडी नाका, गणेशनगर, वजीराबाद, विसावानगर या परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज आला आणि भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यामुळे भयभीत होऊन घरातील नागरिक रस्त्यावर आले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंपमापक यंत्रावर दहा किलोमीटरच्या परिसरात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर १.५ इतकी नोंदली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सायन्स कॉलेज परिसरात असल्याचे सांगण्यात आले आहे.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी तातडीने संपर्क साधला. भूगर्भातील आवाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!