
नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी १६ राज्यातील १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली खरी, परंतु ही यादी जाहीर केल्याच्या आज दुसऱ्याच दिवशी भाजपला दोन जबर धक्के बसले आहेत. दिल्लीतील भाजपचे दिग्गज नेते आणि चांदणी चौकचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. तर पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केलेले भोजपुरी गायक व अभिनेते पवन सिंह यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात चांदणी चौक मतदारसंघातून प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकिट कापल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्तीची घोषणा केली आहे. हर्षवर्धन हे चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा आमदार आणि चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.
ट्विटरवर पोस्ट लिहून डॉ. हर्षवर्धन यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पूर्व दिल्लीच्या कृष्णानगर भागात असलेल्या आपल्या दवाखान्यावर लक्ष देणार असून कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणार असल्याचे हर्षवर्धन यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘माझी तीस वर्षे अतिशय सुरेख अशी राजकीय कारकीर्द राहिली. पाचवेळा विधानसभा आणि दोनवेळा लोकसभा निवडणुकीत मला मोठ्या फरकाने लोकांनी जिंकून दिले. या काळात पक्षात आणि सरकारमध्ये महत्वाची पदे भूषवण्याची संधी मला मिळाली. आता मी यातून बाहेर पडत असून पुन्हा एकदा माझ्या मूळ कामाला मी जात आहे. मी एक स्वयंसेवक आहे. शेवटच्या माणसांपर्यंत सेवा पोहोचली पाहिजे, या पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या अंतोदय तत्वज्ञानाने भारावून जात मी आजवर कार्यरत राहिलो,’ असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर २४ तासांतच माघार
दुसरीकडे भाजपने पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघासाठी भोजपुरी गायक आणि अभिनेते पवन सिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र उमेदवारी जाहीर झाल्याच्या २४ तासांच्या आतच त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
‘भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला आसनसोलसाठी उमेदवारी दिली. पण मी काही कारणास्तव आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवू शकणार नाही’, असे पवन सिंह यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.
पवन सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बंगालमधील लोकांच्या ताकदीमुळेच पवन सिंह यांना माघार घ्यावी लागली, असा टोला बॅनर्जी यांनी लगावला आहे.
