मुंबई: राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले आहे.
शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा घालेवाडी (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) यांनी मिळवला तर खाजगी शाळा गटात शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (ता. बारामती जि. पुणे) द्वितीय आणि भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या ५ मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत १ लाख ३ हजार ३१२ शाळा सहभागी झाल्या. यामध्ये ६४ हजार ३१२ शासकीय शाळा आणि ३९ हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील १ कोटी ९९ लाख ६१ हजार ५८६ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये १ कोटी ४ लाख ६४ हजार ४२० विद्यार्थी व ९४ लाख ९७ हजार १६६ मुलींचा सहभाग होता.
बक्षिसांची रक्कम ६६ कोटींवर
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस ५१ लाख, द्वितीय क्रमांक २१ लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस ११ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभियानात राज्यस्तरावर-१, बृहन्मुंबई मनपा-१, अ व ब वर्ग मनपा-१, विभागस्तरीय-८, जिल्हास्तरीय-३६, तालुकास्तरीय-३५८ अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख व तिसरे पारितोषिक ७ लाख रूपयांचे असेल.८ विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख, तिसरे ७ लाख रूपयांचे, जिल्हास्तरावर पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख रुपये तर तालुकास्तरावर पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख रुपये अशी ६६ कोटी १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले.
उपक्रम नियमितपणे राबवणार
विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम नियमितपणे राबवण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्याचा निर्णय घेऊन ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम राज्यात प्रथमच राबवण्यात आला, असे केसरकर म्हणाले.
या उपक्रमातून शाळांच्या बाह्यघटकांसोबत व आंतर घटकांवर देखील प्रभावी काम करण्यात आले. या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यातून या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते शाळा व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रेरणा मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून प्रोत्साहित केले हेही या उपक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.
‘वाचन सवय प्रतिज्ञा’ची गिनीज बुकात नोंद
वाचन चळवळीमध्ये १८ लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञामध्ये सहभाग घेतला असून शिक्षण विषयक हस्तलिखित स्पर्धेत १३ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेत स्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुकमार्फत घेण्यात आली असल्याचे केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पेपर लेस पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आल्याचे सांगून केसरकर यांनी सांगितले, वीज बचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपक्ररणाचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आले.