अशोक चव्हाण करणार आजच भाजपमध्ये प्रवेश, फडणवीस- बावनकुळेंच्या उपस्थितीत दुपारी होणार प्रवेशाचा कार्यक्रम?


मुंबईः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी साडेबारा वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात चव्हाणांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा सोहळा व्हावा, अशी अशोक चव्हाण यांची इच्छा होती. परंतु अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे आणि राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १५ फेब्रुव्रारी ही अंतिम तारीख आहे, त्यामुळे कोणत्याही बड्या नेत्यांच्या उपस्थितीऐवजी महाराष्ट्रातील नेत्यांच्या उपस्थितीतच अशोक चव्हाणांचा हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगितले जाते. अशोक चव्हाण यांचा आज दुपारी साडेबारा वाजता भाजप प्रवेश होऊ शकतो, असे सांगण्यात येते.

अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आधी आमदारकी आणि नंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसात पुढील निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी काल म्हटले होते. परंतु सध्या राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लवकर उरकला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा रिक्त झाल्या असून या सहा जागांसाठी सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. भाजपकडून महाराष्ट्रातून तीन जणांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी एका जागेवर अशोक चव्हाणांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण हे त्यांचे खंदे समर्थक अमर राजूकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!