छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. वाल्मिक सरवदे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. डॉ. सरवदे यांची ही नियुक्ती कुलगुरूंच्या पदावधी इतकी किंवा वयाची ६५ वर्षे यापैकी जे आधी येईल, तितक्या काळासाठी असेल. डॉ. सरवदे यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाला मोठा प्रशासकीय अनुभव असलेला प्र-कुलगुरू मिळाला आहे.
डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यवस्थापन परिषदेची आज पहिलीच बैठक झाली. या बैठकीत डॉ. फुलारी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १३ च्या पोटकलम (६) मधील तरतुदीनुसार कुलगुरू डॉ. फुलारी यांनी विशेष अधिकारात प्र-कुलगुरूपदी डॉ. वाल्मिक सरवदे यांची नियुक्ती करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेला केली. कुलगुरूंच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने प्र-कुलगुरूपदी डॉ. सरवदे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार प्र-कुलगुरूपदासाठी कुलगुरूंनी केलेल्या नामनिर्देशनाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता देणे आवश्यक आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. फुलारी यांनी व्यवस्थापन परिषदेकडे प्र-कुलगुरूपदासाठी डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या नावाची शिफारस केली. त्यावर चर्चा होऊन डॉ. सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्र-कुलगुरूपदाचा पदावधी कुलगुरूंच्या पदावधी इतका किंवा वयाची ६५ वर्षे यापैकी जे आधी होईल, तितका आहे.
यापूर्वी कुलगुरू डॉ. फुलारी यांनी २९ जानेवारी रोजी डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. परंतु नियुक्तीनंतर अवघ्या ४८ तासांतच त्यांच्याकडून प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार काढून घेतला होता. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्राला धक्का बसला होता. कुलपतींची मंजुरी नसल्याचे ‘तांत्रिक त्रुटी’मुळे घडलेल्या या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली होती.
पुढे अशी घोडचूक कुलगुरू करणार नाही अशी अपेक्षा करु व डॉ वाल्मिक सरवदे यांची पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगूरू पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील काळास खूप खूप शुभेच्छा..
जयभीम