नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील १५ राज्यांतील राज्यभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र पाहता राज्यातील सहा जागांवर राज्यसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यातील राज्यभेच्या ५६ जागांसाठी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल. २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल आणि २७ फेब्रुवारी रोजीच मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
महाराष्ट्रातून राज्यसभेचे सहा खासदार निवृत्त होणार आहेत. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र पाहता महाराष्ट्राच्या कोट्यातून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा त्यांच्या पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदललेले आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा गट पडला आहे. त्यामुळे जून २०२२ च्या तुलनेत महाराष्ट्रातील राज्यभा निवडणुकीची गणिते बदलली आहेत.
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित हेत नाही. मात्र या सभागृहाचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. मूळ राज्यघटनेने राज्यभा सदस्यांचा कालावधी निश्चित केलेला नाही. ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली आहे. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मंजूर करून राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी सहा वर्षे निश्चित केला आहे. देशातील विविध राज्यांच्या विधानसभांमधील लोकप्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करतात.