प्रभारी क्रीडा संचालकांची मनमानी, नियम डावलून विद्यापीठाच्या हॉकी संघात खेळवले स्वतःच्याच महाविद्यालयाचे चार खेळाडू!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भोपाळमध्ये झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत न केलेल्या कामगिरीबद्दल पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आणि त्याआधी चंदीगड-मोहालीत घडलेले ‘मुष्ठीयुद्ध’ क्रीडा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेला असतानाच डॉ. बाबासाहे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी संचालक संदीप जगताप यांनी मनमानी करत नियम पायदळी तुडवून विद्यापीठाच्या हॉकी संघात स्वतःच्याच महाविद्यालयाचे चार खेळाडू खेळवल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

२ ते ८ जानेवारीदरम्यान भोपाळच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या बाद फेरीतच गारद होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला असूनही या संघाने अंतिम फेरीत धडक मारून उपविजेतेपद पटकावल्याच्या खोट्या बातम्या छापून आणून पाठ थोपटून घेण्याचा धक्कादायक प्रकार न्यूजटाऊनने उघडकीस आणला. क्रीडा क्षेत्रात  हा विषय चर्चेचा ठरला असतानाच विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांनी हॉकी संघ निवडीत मनमानी करून स्वतःच्या संत सावता माळी महाविद्यालयाचे चार खेळाडू या संघात घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 कोणत्याही क्रीडा प्रकारात विद्यापीठाचा संघ निवडण्यासाठी किमान संघ आले तरच त्यांच्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेऊन या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड केली जाते. माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या काळात सहभागी संघाची संख्या १० वरून कमी करून पाचवर आणण्यात आली.

 महाविद्यालयांकडून पाच संघांच्या प्रवेशिका आल्या नसतील तर खेळाडूंची थेट सिलेक्शन ट्रायल म्हणजेच निवड चाचणी घेऊन विद्यापीठाचा संघ निवडला जावा, असा नियम आहे. निवड चाचणीमध्ये एका महाविद्यालयाचे तीनपेक्षा जास्त खेळाडू असू नये, असाही नियम आहे. फक्त कोरोना काळापुरती या नियमात शिथिलता आणून तीनऐवजी पाच खेळाडूंचा समावेश करण्यास परवानगी देण्यात आली होती.

कोरोना काळ संपला आणि सध्या सगळे पूर्ववत सुरू झालेले असल्यामुळे प्रचलित नियम आणि निकषांनुसारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हॉकी संघाची निवड करणे अनिवार्य होते. परंतु प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांनी हॉकी संघ निवडीत नियम आणि निकषांना तिलांजंली दिल्याचेच समोर आले आहे.

 हॉकी संघ निवडीसाठी पाचपेक्षा कमी महाविद्यालयीन संघांच्या प्रवेशिका आल्यामुळे हा संघ निवडण्यासाठी खेळाडूंची थेट निवड चाचणी घेण्यात आली. मात्र एका क्रीडा प्रकाराच्या निवड चाचणीत एका महाविद्यालयाचे केवळ तीन खेळाडूच समाविष्ट करण्याचा नियम असतानाही क्रीडा संचालक जगताप यांनी मनमानी केली आणि विद्यापीठाच्या हॉकी संघात ते नोकरी करत असलेल्या फुलंब्रीच्या संत सावता माळी महाविद्यालयाचे  तीनपेक्षा जास्त खेळाडू निवड चाचणीत खेळवून तब्बल चार खेळाडू विद्यापीठाच्या हॉकी संघात समाविष्ट करून घेतले.

प्रभारी क्रीडा संचालक जगताप यांनी मनमानी करून निवडलेल्या विद्यापीठाच्या हॉकी संघात संत सावता माळी महाविद्यालयाचे सिद्धार्थ मोरे, गणेश गौतम, सूरज यादव आणि  किशन चव्हाण या चार खेळाडूंचा समावेश केला. याच संघात खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयाचेही चार खेळाडू घेण्यात आले. नवीन को कोथौटे, सय्यद अहमद अली, करन ठोसरे आणि मोहित कोथौटे यांचा समावेश आहे.

३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या निवड चाचणीत जर एका महाविद्यालयाचे तीनच खेळाडू उतरवण्याचा नियम असेल तर विद्यापीठाच्या हॉकी संघात संत सावता माळी महाविद्यालयाच्या चार खेळाडूंचा समावेश कसा काय करण्यात आला? हा मोठाच प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हॉकी संघात प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप कार्यरत असलेल्या फुलंब्रीच्या संत सावता माळी महाविद्यालयाचे तब्बल चार खेळाडू निवडण्यात आले.

उर्वरित महाविद्यालयांचे काय?

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांची संख्या साडेचारशेच्या आसपास आहे. असे असतानाही विद्यापीठाच्या हॉकी संघात निवडलेल्या १८ खेळाडूंपैकी तब्बल १० खेळाडू केवळ दोनच महाविद्यालयातून निवडण्यात आले. या मनमानीमुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अन्य महाविद्यालयातील होतकरू खेळाडूंवर अन्याय झाला.

होतकरू खेळाडूंना संधी मिळणार कशी?

प्रभारी क्रीडा संचालाक डॉ. जगताप हे संत सावता माळी महाविद्यालयात कार्यरत आहेत, एवढाच एकमेव निकष या चार खेळाडूंच्या निवडीत लावण्यात आला की काय? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बळी तो कानपिळी एवढाच निकष लावण्यात येत असेल आणि ही मनमानी अशीच सुरू राहिली तर उर्वरित महाविद्यालयातील होतकरू खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात विद्यापीठाच्या संघात खेळण्याची संधी मिळणार कशी? असा सवाल यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातून विचारला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!